मुंबई :- वर्षातील दुसरे सूर्यग्रहण मंगळवार, 25 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हिंदुस्थानात दिवाळीच्या दिवशी सूर्यग्रहण दिसण्याचा योग तब्बल 27 वर्षानंतर येत आहे. यापूर्वी 24 ऑक्टोबर 1995 साली दीपावली अमावास्येला झालेले खग्रास सूर्यग्रहण हिंदुस्थानातून दिसले होते.यानंतर दहा वर्षांनी म्हणजेच 3 नोव्हेंबर 2032 रोजी दीपावली अमावास्येला होणारे सूर्यग्रहण उत्तर हिंदुस्थानातून दिसणार आहे, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली.
मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी 4 वाजून 49 मिनिटांनी सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायंकाळी 5 वाजून 43 मिनिटांनी होईल त्यावेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. पश्चिम आकाशात हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी 6 वाजून 08 मिनिटांनी सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील पश्चिमेस सागर किना-यावरून पाहिल्यास सागरात ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. छायाचित्रकारांना ही एक पर्वणीच असेल. देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसेल.
ग्रहण हे वाईट आहे, त्यामुळे वातावरण दुषित होते असा समज प्राचीन काळी होता. परंतु आधुनिक विज्ञानाने सिद्ध केले आहे की, ग्रहणात वातावरण दुषित होत नाही. त्यामुळे ग्रहणात अन्नपदार्थ, पाणी दुषित होत नाहीत. गरोदर स्त्रियांनी ग्रहणात भाजी चिरली तर मुले विकृत जन्माला येतात असाही पूर्वी समज होता परंतु आरोग्य विज्ञानाप्रमाणे त्यात काहीही तथ्य नसल्याचे दिसून आले. उलट युरोपमध्ये थायलिदोमाईड हे चुकीचे औषध घेतल्यामुळे हजारो मुले विकृत जन्माला आली. ती चुकीच्या औषधामुळे, ग्रहणात भाजी चिरल्यामुळे नव्हे. तरीही ग्रहण पाळायचे की नाही पाळायचे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे, असे सोमण सांगतात.
ग्रहणकाळ…
- ग्रहण प्रारंभ - सायंकाळी 4 वाजून 49 मिनिटांनी.
- ग्रहण मध्य - सायंकाळी 5 वाजून 43 मिनिट यावेळी 36 टक्के सूर्यबिंब चंद्रामुळे झाकले जाईल.
- सायंकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी ग्रहणातच सूर्य मावळेल.
कसे पाहाल?
सूर्यग्रहण ग्रहण चष्म्यातूनच पहावे. साध्या डोळ्यांनी पाहू नये अन्यथा दृष्टीस इजा होते.
ग्रहण शुभच, कारण…
ग्रहण शुभ की अशुभ यावर सोमण बोलले. जे लोक ग्रहण पाहतील त्यांच्या राशीला हे ग्रहण शुभ आहे. कारण निसर्गाने दिलेल्या संधीचा ते शिक्षणासाठी उपयोग करून घेत आहेत. जे ग्रहण पाहणार नाही त्यांच्यासाठी अशुभ असे मी म्हणेन. कारण, आलेल्या संधीला ते मुकणार आहेत, असे सोमण यांनी सांगितले.