कोरपना :- शेतविक्रीच्या व्यवहारातून शहरातील विलास वासुदेव मांडवकर या व्यक्तीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असून, आत्महत्येपूर्वी लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा गडचांदूर नगरपालिकेचे उपाध्यक्ष शरद जोगी आणि प्रशांत पाचभाई या दोघांमुळे हे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी बुधवारी रात्री शरद जोगी व प्रशांत पाचभाई या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे.
गडचांदूर येथील मृत विलास मांडवकर यांनी लिहीलेल्या सुसाईट नोटमध्ये मनोज शर्मा नामक व्यक्तीसोबत पाच एकर जमिनीचा सौदा केला होता. ती जमीन रस्त्यामध्ये जात असल्यामुळे मोबदला मिळावा, असे म्हटले होते. सोबत दिनेश सोनी, मनोज शर्मा, बाळू घायवनकर व इतरांनी आईवडिलांकडून साडे अकरा एकरची रजिस्ट्री करून घेतली. प्रशांत पाचभाई याने आपल्याला कुठेही जावू दिले नाही. यासह इतरही मजकूर लिहीला असून, त्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे. वडगाव परिसरात आजीच्या नावाने ११ एकर जमीन होती. ५ एकरचा सौदा शरद जोगी यांच्यासोबत करण्यात आला होता. मात्र, ११ एकरची रजिस्ट्री करून घेतली. धनादेशाद्वारे रक्कम दिली आणि तेच धनादेश
परत देण्यासाठी दबाव टाकण्यात आला. एक धनादेश धमकी देवून जोगी यांनी परतही नेला. उर्वरित धनादेश न दिल्यास मुलाचा खून करण्याची धमकी दिल्याने वडिलाने विष प्राशन करून जीवन संपविल्याचे मृत विलासच्या मुलाने सांगितले.
शरद जोगी आणि पोतनुरवार यांनी जमीन खरेदी केली होती. त्यानंतर पैसे परत करण्यासाठी शरद जोगी आणि पाचभाई धमकी देत होते. नकार दिल्यानंतर पतीला धमकी देवून मुलाला ठार मारण्याची भाषा करीत होते.. त्यामुळे विष प्राशन केल्याचे मृत विलासच्या पत्नीने म्हटले असून, शरद जोगी हे मागील आठ ते दहा वर्षांपासून जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवसायात असून, पोलिसांनी जोगी व पाचभाईवर गुन्हे दाखल केले आहे, सध्या दोघेही परार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत.शरद जोगीनी यापुर्वीही लेआऊट मध्ये अनेक भोंगळ कारभार केल्याचे बोलल्या जात आहे.त्यांची सखोल चौकशी केल्यास अनेक प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, त्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर आणून ठेवला होता. भाजपाचे शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार, निलेश ताजणे, नगरसेवक अरविंद डोहे, सागर ठाकुरवार, चुधरी व एका नातेवाईकासोबत ठाणेदारांनी चर्चा करून शवविच्छेदन अहवालाप्रमाणे कारवाई केली जाणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह उचलण्यात आला होता. दरम्यान, अहवाल आल्यानंतर बुधवारी रात्री भादंवि कलम ३०६ व ३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, या प्रकरणात आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.