मुंबई: राज्याच्या विविध भागात पाऊस (Rain) पडत आहे. हवामान विभागानं (Meteorological Department) दिलेल्या अंदाजानुसार पाऊस पडत आहे.
राज्यात काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला तरी काही ठिकाणी मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे (Thane) परिसरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. तसेच अहमदनगर, जळगाव आणि औरंगाबाद जिल्ह्यातही जोरदार पावसानं हजेरी लावली. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं. तसेच वाहतुकीवर देखील परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आज देखील राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पुढील तीन ते चार दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पाहता, पुढील तीन ते चार दिवस विदर्भाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ हवामानासह, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. आज विदर्भासह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय?
यलो अलर्ट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न सगळ्यांना पडला असेल. तर या यलो अलर्टमध्ये हवामान खात्यानं हलक्या पावसाची शक्यता वर्तवलेली असते. तसेच यलो अलर्ट हा सावध राहण्यासाठी दिला जातो. हा इशारा वॉचसाठी दिलेला असतो. जेव्हा हवामानात बदल होतो तेव्हा हा अलर्ट दिला जातो. तुम्हाला तत्काळ धोका नाही. परंतु, हवामानाची स्थिती पाहता, तुम्ही ठिकाण आणि तुमच्या प्रवासाची काळजी घेतली पाहिजे, असे या अलर्टचा अर्थ आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी
जळगाव जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. या पावसामुळं नद्या, नाले वाहू लागले आहेत. जिल्ह्यातल्या 7 मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली. या पावसानं कापूस, मका ही पिकं धोक्यात आली आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पावसामुळं काही ठिकाणी जनजीवनही विस्कळीत झालं आहे.तसेच वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातही जोरदार पावसाची हजेरी
गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक भागात दमदार पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रस्ता नसल्यानं विद्यार्थ्यांना गुडग्याएवढं पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. पावसामुळं रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाल्याचे पाहायला मिळालं. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना सुद्धा पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागला. नदीच्या पाण्यात वाढ झाल्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसले आहे. त्यामुळं शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.