अठरापगड जाती संघटनांचा एल्गार,



चंद्रपूर - आधी कोरोनाचे संकट आणि आता महागाईने जनता त्रस्त असताना राजकर्त्यांनी लोकांनी धीर देणे अपेक्षित होते. पंरतु सत्ताधारी असो कि विरोधक लोकांच्या प्रश्नांकडे ,समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. उलट त्यांच्याकडून धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे भविष्यात दंगली होतील. यात सर्वसामान्य कुटुबांची घरे जळतील. त्यांचीच मुले उद्धध्वस्त होतील. हा जीवघेणा खेळ थांबवा.दगड आणि तलवारी देण्याएेवजी आमच्या मुलांच्या हाताला रोजगार द्या, अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील अठरापगड जातींच्या तब्बल बावीस संघटनांनी राज्याचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते यांच्यासह प्रमुख पक्षांच्या नेत्यांकडे केली.
यांसदर्भात या समाज संघटनांच्या प्रतिनिधींनी आज शनिवारला चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषद आपली भूमिका मांडली. अद्याप कोरोनाचे संकट गेले नाही. लाखो लोकांचे रोजगार बुडाले. कोट्यवधी छोट-मोठे उद्योग बंद पडले. आता कुठे पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महागाई, इंधनाचे दर गणनाला भिडले आहे.या वर राजकीय पक्ष बोलायला तयार नाहीत.
प्रत्येकाला आपल्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार संविधानानेच दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या प्रगतीसाठी आपले आयुष्य झिजविले. त्यामुळे आज आमचा बहुजन समाज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तर दुसरीकडे धार्मीक दंगली आणि तेढ निर्माण करण्यात आमच्याच समाजातील तरुण-मुलांचा वापर केला जातो. आजवरच्या अनेक दंगलीत हीच वस्तुस्थिती समोर आली आहे. आमच्या मुलांचा अशा पद्धतीने होणारा वापर चिंतेची बाब आहे. मात्र,यापुढे आम्ही बहुजन समाजातील मुलांचा दंगलीसाठी वापर होवू देणार नाही, असेही या प्रतिनिधींनी यावेळी सांगितले.


आमच्या समाजातील मुले सर्वच पक्षात आहे. त्यांनी प्रगती करावी. योग्य सभागृहात लोकांचे प्रश्न मांडावे. लोकांच्या मुलभूत प्रश्नासाठी लढावे. मात्र, धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या प्रक्रियेत त्यांनी सामील होवू नये. त्यामुळे त्यांचे वैयक्तिक नुकसान होईल. समाज आणि देशालाही याचा भुर्दंड सोसावा लागेल. धार्मिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली आमचीच मुले तुरुंगात जातात, राजकीय हेतू साध्य झाल्यावर त्यांना सोडविण्यासाठी कोणी पुढे येत नाही. आईवडिलांनाच आपल्या मुलांसाठी कचेरी आणि न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागतात. यात त्यांचे आयुष्य उध्वस्त होते. कुटुंबालाही मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे बहुजन समाजातील युवकांनी अशी धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कुठल्याही आंदोलनात सहभागी होवू नये, असे आवाहन त्यांनी केली.
समाजातील तरुणांच्या वेगळ्या समस्या आहेत. शिक्षा, आरोग्य, रोजगार, महागाई या खऱ्या समस्या आहेत. त्या दूर करण्याची आज खरी गरज आहे. त्यावर कोणी बोलायला तयार नाही आम्ही मतदान याच साठीच केले होते काय, असा प्रश्न समाज संघटनां म्हणून आम्हाला पडत आहे. राजकीय प्रक्रियेत लोकांचे कल्याण महत्वाचे असते. लोकांच्या मुलभूत प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देवून राजकीय पक्ष विकास कामांवर मते मागतात. मात्र एकदा निवडून आल्यानंतर ते लोकांच्या जिवनाशी निगडीत नसलेले मुद्दे उकरून काढतात, असा अनुभव आम्हाला येत आहे. आम्ही अठरापगड जातीच्या संघटना म्हणून समाजातील युवकांना आवाहन करतो. धार्मिक उन्मादात तुम्ही सामील होवू नका. आपल्या पक्षावर. नेत्यांवर प्रेम करा. परंतु त्यांनी सांगितले म्हणून आपल्या घरादाराची रांगोळी होईल, असे कोणतेही कृत्य करु नका, अशी विनंती त्यांनी केली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धध्व ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संघटनांकडून निवेदन पाठविला जाणार आहे.
पत्रपरिषदेला डॉ. राकेश गावतुरे, डॉ. सचिन भेदे. डॉ. राजू तोटेवार, आनंदराव अंगलावर, विजय पोहनकर, प्रा. अशोक कासावर, रतन शिलावार, विजय मुसळे, अर्जुन आवारी, अविनाश आंबेकर, ऍड. प्रशांत सोनूले, राजू सिडाम, विकास शेंद्रे यांच्यासह बावीस संघटनांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.

या समाज संघटनांचा पाठींबा
कुणबी समाज मंडळ, अखिल भारतीय माळी महासंघ, तैलिक महासंघ. अखिल महाराष्ट्र कुंभार समाज, बेलदार समाज, व्हीजेएनटी वेलफेअर असोसिएशन,धनगर जमात, गाडी लोहार समाज, भोई समाज, गांडली समाज, आदिवास समाज, भारतीय बौद्ध महासभा, महाराष्ट्र प्रदेश गोलकर समाज, नाभिक समाज, फ्रान्सिस ख्रिस्ती समाज, गोवारी समाज, अखिल भारतीय मातंग समाज, भाट समाज , सुतार समाज, मातंग समाज, आदिवासी माना समाज, विदर्भ बारई समाज, झाडे कुणबी समाज, भावसार समाज, धोबी समाज, शिंपी समाज, कलार समाज या संघटनांनी या निवेदनाद्वर स्वाक्षरी केली आहे.