त्या नरभक्षक बिबटयाला तातडीने जेरबंद करावे – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी.दुर्गापूर परिसरातील नरभक्षक बिबटयाला त्‍वरीत जेरबंद करावे व अशा घटनांची पुनरावृत्‍ती होवू नये यादृष्‍टीने तातडीने उपाययोजना करण्‍याची मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

काल दुर्गापूर परिसरात नरभक्षक बिबटयाने एका मुलाला ठार केल्‍याची घटना घडली. शहराच्‍या हद्दीत वन्‍यप्राण्‍यांनी येवून नागरिकांना ठार करणे व त्‍या माध्‍यमातुन मानव वन्‍यजीव संघर्ष निर्माण होणे ही अतिशय गंभीर व चिंतेची बाब आहे. यासंदर्भात सिसीटिव्‍ही सर्व्‍हेलन्‍स सिस्‍टीमचा उपयोग करणे अत्‍यंत गरजेचे आहे. त्‍याचप्रमाणे मध्‍यप्रदेश पॅटर्ननुसार सायरन प्रणालीचा वापर करण्‍याची आवश्‍यकता आहे.जंगली जनावर जर गावाकडे येत असेल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून सायरन प्रणाली विकसित करावी. वाघ व बिबट यांच्‍या हल्‍ल्‍यात निरपराध नागरिकांचे बळी जाण्‍याच्‍या घटना सातत्‍याने घडत आहेत. त्‍यामुळे या घटनांवर प्रतिबंध घालण्‍याच्‍या दृष्‍टीने तसेच मानव वन्यजीव संघर्ष वाढू नये यादृष्टीने तातडीची उपाययोजना करण्‍याची आवश्‍यकता आहे, तसेच सरकारने उच्चस्तरीय बैठक आयोजित करून कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. असेही आ. सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे. या नरभक्षक बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अन्यथा भारतीय जनता पार्टी आंदोलन छेडेल असा इशारा आ. मुनगंटीवार यांनी दिला.