चंद्रपूर प्रीमियर लीग CPL टी 20 लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना डायनॅमिक फायटर्स आणि भद्रावती ग्रेनेड्स संघात 27 फेब्रुवारी रविवारी सकाळी 9 वाजता खेळला जाणार आहे. शहरातील लाईफ फाउंडेशन च्या वतीने ही स्पर्धा आयोजित केली जाते. स्थानिक रामनगरच्या सेंट मायकेल शाळेच्या मैदानावर या स्पर्धेत 16 संघांचे प्रत्येकी 15 खेळाडू असे एकूण 240 खेळाडू विजेतेपदासाठी झुंजले.गेले काही दिवस ही प्रतिष्ठेची स्पर्धा जिंकण्यासाठी खेळाडूंनी आपले कौशल्य पणाला लावले. शुक्रवार 25 फेब्रुवारी रोजी स्पर्धेचे सेमिफायनल सामने खेळले गेले. 26 फेब्रुवारी रोजी विश्रांतीचा दिवस आहे.
शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात डायनॅमिक फायटर्स संघाने थ्री एसेस संघाचा 4 धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली. थ्री एसेस संघाच्या शुभम दुबेच्या तडफदार 98 धावा मात्र निष्फळ ठरल्या.
तर दुपारच्या दुसऱ्या सामन्यात भद्रावती ग्रेनेड्स संघाने उत्तम सांघिक खेळाचे प्रदर्शन करत 204 धावा केल्या. उत्तरात ब्लॅक गोल्ड संघाला केवळ 151 धावाच करता आल्या. अशा रीतीने भद्रावती ग्रेनेड्स चा स्पर्धेतील सातत्यपूर्ण खेळ त्यांना अंतिम सामन्यात घेऊन गेला. या सामन्यातील सर्वात मोठा लक्षवेधी ठरल्या त्या ग्रेनेड्स च्या कुशल पिंपळकर याच्या 111 धावा. आठव्या पर्वातील पहिले शतक त्याने नोंदविले आणि क्रिकेटप्रेमींना अवर्णनीय आनंद दिला.
यंदा अंतिम स्पर्धेत दाखल झालेले दोन्ही संघ प्रथमच अंतिम फेरीत पोचले आहेत. त्यामुळे CPL आठव्या पर्वात नव्या संघाला विजेतेपद निश्चित झाले आहे.
रविवारी विजेत्या संघाला १ लाख ११ हजार १११ रु. व लखलखती ट्रॉफी दिली जाणार आहे. स्पर्धेच्या यशासाठी लाईफ फाउंडेशन चे अध्यक्ष संजय तुमराम, उपाध्यक्ष आरीफ खान, नाहीद सिद्दीकी ,सचिव सुनील रेड्डी, कोषाध्यक्ष बॉबी दीक्षित, सदस्य शैलेंद्र भोयर, डॉ. किशोर भट्टाचार्य, रईस काजी, आर्किटेक्ट वसीम शेख, कमल जोरा, प्रकाश सुर्वे, जितेंद्र मशारकर, आशीष अम्बाडे कार्यरत आहेत.