अनाथांची माय काळाच्या पडद्याआड
पुणे - अनाथ मुलांसाठी आयुष्य वेचणा-या पद्मश्री पुरस्कारप्राप्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांचे पुण्यात दीर्घ आजाराने आज निधन झाले.

त्या अनेक दिवसांपासून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत होत्या. सिंधूताई यांचे मांजरी येथील पुनर्वसन केंद्रात अनेक अनाथ मुले राहत आहेत. त्यांच्या जाण्याने या अनाथ मुले पोरकी झाली आहेत. सिंधूताई या माई नावाने परिचित होत्या.

सिंधूताईंच्या निधनाने  असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले : आ. सुधीर मुनगंटीवारज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या , आपल्या कर्तृत्वाने अनाथांची माय अशी ओळख निर्माण करणाऱ्या माई अर्थात पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.

माईंनी अनाथांच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले. त्यांचे संघर्षमय आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. निस्वार्थ समाजसेवा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे माई. त्यांचा प्रेमळ स्वभाव व  वात्सल्यमयी व्यक्तिमत्व या माध्यमातून त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनात घर निर्माण केले. अनाथांची माय होताना त्यांच्या व्यथा वेदनांशी त्या एकरूप झाल्या. बेटा असे संबोधत त्यांनी अनेकांवर मायेचा वर्षाव केला .त्यांच्या निधनाने असंख्य अनाथांचे मातृछत्र हरपले अशी शोकभावना आ. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.