बालरोगतज्ञ डॉक्टराची गोळ्या झाडून हत्याप्रतिनिधी । यवतमाळ :- भरदिवसा एका ४० वर्षीय बालरोगतज्ञ डॉक्टराची अंधाधूंद गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ही धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात असलेल्या शासकीय रूग्णालय परिसरात मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमूळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून डॉक्टरच्या हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यातच आहे. हनुमंत धर्मकारे वय ४० वर्ष रा. उमरखेड असे मृत बालरोगतज्ञ डॉक्टरांचे नाव आहे. महिनाभरात डॉक्टरच्या हत्येची ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड शहरात अतिशय कठिण परिस्थितीतून डॉक्टरेट पदवी मिळवून मागील चार वर्षात शहरात आपला ठसा उमटविला होता. डॉ. हनुमंत धर्मकारे उमरखेड शासकीय रुग्णालयात बालरोगतज्ञ म्हणून सेवा देत होते. मंगळवारी नेहमीप्रमाणे डॉ. हनुमंत धर्मकारे शासकीय रुग्णालयात सेवा देत होते. अश्यात ११ वाजताच्या सुमारास शासकीय रुग्णालयासमोरील असलेल्या एका हॉटेलवर ते इतर डॉक्टरांसोबत चहा घेण्यासाठी गेले. यावेळी समोरून येणाऱ्या दुचाकीस्वारांने डॉ. हनुमंत धर्मकारे यांच्यावर अंधाधूंद गोळीबार करीत पळ काढला. यात गंभीर जखमी होवून डॉ. हनुमंत धर्मकारे यांचा मृत्यू झाला. 


घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला, त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता रूग्णालयात पाठविला. वृत्तलिहिपर्यंत डॉ. हनुमंत धर्मकारे यांची हत्या कोणी व का केली? कळू शकले नव्हते. महिन्याभरापूर्वीच यवतमाळ जिल्हा शासकीय रूग्णालयातील शिकाऊ डॉ. अशोक पाल यांची हत्या झाली होती. या घटनेमूळे जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर मंगळवारी उमरखेड शहरातील बालरोग तज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाल्याने डॉक्टरही असुरक्षीत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.