बल्लारपूरचे "वाघ" १३जानेवारीपर्यंत पिंजऱ्यातबल्लारपूर -बोगस मजूर दाखवून करोडो रुपयांची निधी हडप करणारे प्रफुल्ल वाघ यांना 5 जानेवारीला अटक झाल्या नंतर त्यांना 10 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यांना आज सोमवारला बल्लारपूर येथील न्यायालयात हजर करण्यात आले.न्यायालयाने प्रफुल्ल वाघ यांना 13 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यामुळे आणखी काही मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
चंद्रपूर वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयात 1 कोटी 63 लाख 95 हजार 507 रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी बल्लारपूर वनविकास महामंडळाचे तत्कालीन विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल नरहर वाघ याला आर्थिक गुन्हे शाखेने नागपुरातून अटक केली. वाघ व त्याचे सहकारी जुन्या सागवान आणि बांबूचे अधिक उत्पादन दाखवायचे परंतु प्रत्यक्षरीत्या कमी प्रमाणात विक्री केली जायची. कन्हाळगाव वन परिक्षेत्रात सागवान व बांबूच्या कटाईसाठी बोगस मजूर दाखवून शासनाची सुमारे तीन वर्ष लूट केल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. सन 2015-16 व 2026-17 या दोन आर्थिक वर्षांत वनविकास महामंडळाच्या बल्लारपूर कार्यालयांतर्गत कन्हाळगाव वनपरिक्षेत्रात सागवान कटाई व बांबू निष्कासनाची कामे करण्यात आली. यासाठी प्रत्यक्ष कामावर लावलेल्या मजुरांपेक्षा अधिक मजूर दाखविण्यात येत होते. तसेच कटाई अधिक मालाची दाखवून विक्रीकरिता कमी माल पाठवून शासनाला चुना लावण्याचे काम सुरू होते. या आशयाची तक्रार विद्यमान विभागीय व्यवस्थापक पाठक यांनी 17 ऑक्टोबर 2021 ला केली होती. या प्रकरणी पोलिसांनी वाघ यांना 5 जानेवारीला अटक केली, न्यायालयाने त्यांना 10 जानेवारी पर्यंत 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली


कागदपत्रांची छाननी सुरू आहे- देशमुख
वाघ यांच्या कार्यकाळात केलेल्या सर्व कामांची कागदपत्रे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतली आहेत. त्याची छाननी सुरू आहे. वनउपज उत्पादनाची चालान व बँकेतून मजुरांना देण्यासाठी आलेली रक्कम याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे नेमके किती मजूर त्यांनी बोगस दाखविले आणि किती उत्पादित माल अधिक दाखवून प्रत्यक्ष कमी दाखवला हे अभ्यासाअंती स्पष्ट होणार आहे. अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक शेखर देशमुख यांनी दिली.