चंद्रपूर:- मागील काही वर्षांपासून खेडी ते गोंडपिपरी या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम एका खाजगी कंत्राटदाराला देण्यात आले आहे. दोन वर्षापुर्वी दुतर्फा असलेली झाडे तोडून या कंत्राटदाराने करोडोंची मलाईच जमविली, मात्र या रस्त्याच्या दुरूस्तीच्या नावाने या मार्गावर निव्वळ खड्डे पडले आहे. या रस्त्यावर पडलेले जिवघेणे खड्डे यावर कुणाचेही लक्ष नाही. यासंदर्भात माहिती काढली असता कंत्राटदाराला कोरोनामुळे सहा महिन्यांचे "extension" मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे, जिवघेण्या या रस्त्यावर अपघात होऊन दूर्घटना किंवा जिवीतहानी झाल्यास त्यास दोषी सा.बां. विभाग राहील की कंत्राटदार ही बाब स्पष्ट व्हावी. जागोजागी पडलेले मोठ-मोठे खड्डे जिवघेणी ठरत असल्याने कंत्राटदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा या विरोधात तिव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
खेडी ते सावली या महामार्गावर आंध्रप्रदेश, छत्तीसगड, चेन्नई व इतर राज्यातील जड वाहने ये-जा करीत असतात त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.या रस्त्याची दुरवस्था बघून तात्कालीन अर्थ नियोजन व वनमंत्री व सध्याचे लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ.सुधिर मुनगंटीवार यांनी रस्त्याच्या नुतनीकरणाचे कंत्राट काढले, मात्र ज्या कंपनीला हे कंत्राट मिळाले त्यांनी तर फक्त नावापुरते "सावधान रोडचे काम चालू आहे वाहने हळू चालवा!"अश्या आशयाचे फलक लावून नागरीकांच्या डोळ्यात धुळ झोकत आहे.या रोडवर आतापर्यंत अपघाताने अनेकांनी आपले प्राण गमावले आहे.मात्र या कंत्राटदाराला कश्याचेही देणेघेणे नसल्याचे दिसून येत आहे.२०१९ या कालावधीत कोरोनाच्या महामारीमुळे या कंत्राटदाराला ६ महीण्याचा वाढीव कालावधी मिळाले असताना सुद्धा त्यांनी गेली दोन वर्षं कुठलेच कामे केलेली नाही.अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार येणाऱ्या दिवाळीपासून नूतनीकरणाच्या कामाचा श्रीगणेशा करणार असून मार्च २०२२पर्यंत काम पुर्ण करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात येत आहे.मात्र ज्या कंत्राटदाराच्या कामाच्या विलंबामुळे अनेकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले त्यांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या कंत्राटदाराला काळा यादीत टाकून त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा याविरोधात तिव्र जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कन्नावार यांनी निवेदनाद्वारे केली आहे. रासपच्या निवेदनावर त्वरित गांभीर्याने दखल घेण्यात न आल्यास व दुर्घटनेत जिवीतहानी झाल्यास सा. बां. विभाग विभाग यास जबाबदार राहील, अशी चेतावणी या वृत्ताच्या माध्यमातून देण्यात येत आहे.