मुल शहरातील विविध विकासकामांसंदर्भात अधिकारी वर्गांने गांभीर्याने सत्वर कार्यवाही करावी, विकासकामांचा दर्जा उत्तम राहावा यादृष्टीने विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
दिनांक ९ ऑक्टोंबर २०२१ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुल शहरातील विविध विकासकामांबाबत आढावा घेतला. प्रामुख्याने रामपूल तलावाजवळील रस्ता, सौंदर्यीकरण, जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरण, आठवडी बाजार, पट्टे वाटप, पंतप्रधान आवाज योजनेअंतर्गत घरकुल, कृषी विभाग कार्यालयासाठी जागा आदी विषयांबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आढावा घेतला.
रामपूर तलावाजवळच्या रस्त्यासाठी २ कोटी रू. अपेक्षित आहे. जलसंपदा विभागाने याबाबतचे अंदाजपत्रक त्वरीत सादर करावे, तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी १.७३ कोटी रू. निधी अपेक्षित आहे याबाबत सुध्दा विभागाने अंदाजपत्रक सादर करावे. यासंदर्भात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह बैठक आयोजित करून योग्य मार्ग काढण्यात येईल, असे आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्याचप्रमाणे रामपूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या नुतनीकरणासाठी जलसंपदा विभागाने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, यासाठी लागणारा निधी जिल्हा परिषद देणार असल्याचेही ते म्हणाले.
आठवडी बाजाराची एकूण प्रशासकीय मान्यता ११ कोटी रूपयांची आहे त्यापैकी आतापर्यंत ६.४८ कोटी रू. प्राप्त झाले असल्याचे श्री. वसुले यांनी सांगीतले. अप्राप्त निधीसाठी सचिव नगरविकास यांच्याशी पाठपुरावा करण्यात येईल व निधी प्राप्त झाल्यानंतर बाजारात पंखे, लाईट्स, हायमास्ट लाईट्स लावण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. संपूर्ण आठवडी बाजाराला सोलर करण्यासाठी २५ लक्ष रू. निधी अपेक्षित असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-याने सांगीतले. याबाबतचा प्रस्ताव विभागाने सादर करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. आठवडी बाजाराच्या सुरूवातीलाच सार्वजनिक बांधकाम विभागाने एक चौकी बांधावी व नगर परिषदेने त्यासाठी मनुष्यबळ पुरवावे अशा सुचना त्यांनी यावेळी दिल्या. आठवडी बाजाराच्या ठिकाणी सिसी टिव्ही कॅमेरे लावावे, बाजाराच्या दर्शनी भागाचे सौंदर्यीकरण करावे, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
गोंडपिपरी- खेडी रस्त्याचे बांधकाम त्वरीत पूर्ण करण्याबाबत अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ यांना त्वरीत निर्देशीत करण्याबाबत आ. मुनगंटीवार यांनी सुचना दिल्या. मारोडा येथील पाणी पुरवठा योजनेचे काम अपूर्णावस्थेत आहे. ते त्वरीत पूर्ण करण्याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला सुचना देण्याबाबत आ. मुनगंटीवार यांनी निर्देश दिले. पट्टे वाटपासंदर्भात संबंधित अधिका-यांसह २० ऑक्टोबरपूर्वी बैठक लावण्याचे निर्देश त्यांनी दिले. पंतप्रधान आवास योजने संदर्भात म्हाडाचे सचिव श्री. अनिल डिग्गीकर यांच्यासोबत बैठक घेण्यात येईल, तत्पुर्वी श्री. डिग्गीकर यांनी चंद्रपुर, मुल, बल्लारपूर, पोंभुर्णा येथील न.प. अधिका-यांची झूम बैठक घेवून योजनेची संपूर्ण माहिती घेण्याबाबत देखील त्यांनी सुचित केले.
कृषी विभाग कार्यालयासाठी जागा उपलब्ध नाही. उपविभागीय अधिकारी कार्यालयात जागा देण्यासाठी उपविभागीय अधिका-यांनी मान्यता दिली आहे. कृषी विभागाने जागा योग्य वाटत असल्यास कार्यालय सुरू करण्याबाबत त्वरीत कार्यवाही करण्याचे निर्देश आ. मुनगंटीवार यांनी दिले. नगर परिषद इमारतीच्या बाजूला असलेल्या पोलिस स्टेशन परिसरात असलेल्या पोलिस स्टेशन परिसरात किती जागा उपलब्ध आहे याची माहिती त्वरीत घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. जेणेकरून तिथे उपविभागीय अधिकारी कार्यालय, पोलिस स्टेशन येथील कर्मचा-यांच्यासाठी निवासस्थान बांधता येईल काय याचा अभ्यास करावा असेही आ. मुनगंटीवार यांनी सुचित केले.
बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. संध्या गुरनुले, मुलच्या नगरध्यक्षा सौ. रत्नमाला भोयर, मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम, उपनगराध्यक्ष नंदू रणदिवे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रशांत वसुले, उपविभागीय अधिकारी श्री. खेडेकर, तहसिलदार श्री. होळी, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. काळे, कृषी विभागाचे अधिकारी, पर्यटन विभागाचे अधिकरी आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.