मुंबई : आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत रविवारी (24 ऑक्टोबर) तिसऱ्यांदा गोंधळ उडाला. परीक्षादरम्यान विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय. या पार्श्वभूमीवर भाजपने आक्रमक भूमिका घेतलीय. या सर्व गोंधळाला आरोग्यमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार आहेत. त्यांनी या गोंधळाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी आहे.
परीक्षेत उडालेल्या गोंधळाला टोपे जबाबदार!
“आरोग्य विभागातर्फे परीक्षा घेण्याचे कंत्राट न्यासा कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने केलेल्या गोंधळामुळे परीक्षा पुढे ढकलण्याची नामुष्की राज्य सरकारवर आली होती. उत्तर प्रदेश आणि राज्यातील महविकास आघाडी सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आग्रहामुळे याच कंपनीला आज झालेल्या परीक्षा घेण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यामुळे आज परीक्षेत उडालेल्या गोंधळाला आरोग्यमंत्री टोपे हेच जबाबदार आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा,” अशी भाजपाची मागणी आहे.
मुंबई, पुणे, नाशिक या केंद्रांवर परीक्षेवेळी गोंधळ!
“24 ऑक्टोबर रोजी झालेल्या परीक्षेवेळी अनेक ठिकाणी गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांना वेळेत प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नसल्याचे उघड झाले. उमेदवारांच्या आसन व्यवस्थेमध्येही गोंधळ उडाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मुंबई, पुणे, नाशिक या केंद्रांवर परीक्षेवेळी गोंधळ झाल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. काही विद्यार्थ्यांना सकाळच्या परीक्षेसाठी एक केंद्र तर दुपारच्या परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील केंद्र दिले गेले आहे. नाशिक येथे खासगी वाहनांतून प्रश्नपत्रिका आणल्या गेल्याचीही तक्रार आहे. या परीक्षा प्रक्रियेबाबत संशय व्यक्त होत असल्याने या परीक्षा नव्याने घेण्यात याव्यात,” असेही भांडारी यांनी म्हटलंय.
आरोग्य भरती परीक्षेमध्ये महाराष्ट्रभर गोंधळ!
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातील गट क प्रवर्गातील पदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या परीक्षेत गोंधळ निर्माण झाल्याचं दिसून आलं. पुण्यातील आझम कॅम्पस येथील परीक्षा केंद्रावर 10 ची वेळ देण्यात आलेली असताना तिथे पर्यवेक्षक, परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका पोहोचल्या नसल्याचं समोर आलं आहे. परीक्षा केंद्रावर सुपरवायझर आले नसल्यानं विद्यार्थी संतप्त झाले होते. नाशिकमध्येही परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ उडालेला होता.
विद्यार्थी संतप्त
पुण्यातील आरोग्य विभागाच्या परीक्षेत मोठा गोंधळ निर्माण झाल्यानं विद्यार्थी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. परीक्षा केंद्रावर काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या; तर काही जणांना प्रश्नपत्रिका मिळाल्या नव्हत्या. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले होते. दोन दोन वेळा परीक्षा द्यायला यावं लागतंय. सिंधुदुर्ग, बीडमधून विद्यार्थी पुण्यात परीक्षेसाठी दाखल झाले होते. तीन तीन हजार रुपये खर्चून परीक्षेसाठी आलो असल्याचं म्हणत यावेळी विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय.