अवैध दारू विक्री व गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. यावर बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, जिल्ह्यात अवैध दारु मोठ्या प्रमाणावर वाढली होती. लहान बालके, महिला अवैध दारुच्या धंद्यात उतरले होते. तरुण वर्ग अमली पदार्थाच्या आहारी जात होते. त्यामुळं क्राईम वाढले होते. दारू बंदी होताच अवैध दारू सुरू झाली होती. मागील सरकार ने दारू बंदी केली मात्र अंमलबजावणी करू शकले नाही, आंध्र, तेलंगणा आणि अवतीभवतीच्या जिल्ह्यातून दारू येत होती. समितीच्या अहवालानुसार दारू बंदी उठविली आहे, असं वडेट्टीवार म्हणाले.
वडेट्टीवार म्हणाले की, जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वात समिती स्थापन केली होती. अडीच लाख निवेदन दारू बंदी उठवा असे तर 30 हजार दारू बंदी कायम ठेवा या मागणीसाठी आली होती. त्यानंतर पुन्हा एक समिती स्थापन केली होती. जिल्ह्यात क्राईम वाढले होते. महिलांवर गुन्हे दाखल झाले होते. जनतेच्या सर्व घटकांसोबत बोलून झा समितीने अहवाल दिला होता. त्यानुसार दारू बंदी उठविली आहे, असं ते म्हणाले.