माण पं.स.सभापतीपदी पहील्यांदाच रासपचा झेंडा



दहिवडी : माण पंचायत समितीच्या दहापैकी सर्वपक्षिय आठ सदस्यांनी आपली एकजूट कायम ठेवल्याने माण पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रीय समाज पक्षाच्या लतिका वीरकर यांची बिनविरोध निवड झाली. माण पंचायत समितीच्या तत्कालीन सभापती कविता जगदाळे यांच्यावरील अविश्वास ठराव बारा एप्रिल रोजी आठ विरुध्द दोन असा मंजूर झाला होता. त्यानंतर प्रभारी सभापती म्हणून विद्यमान उपसभापती तानाजी कट्टे हे काम पाहत होते.
रिक्त झालेल्या सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार सभापती निवडीसाठी आज (मंगळवार) माण पंचायत समितीत विशेष सभा बोलाविण्यात आली होती. पिठासन अधिकारी तथा प्रांताधिकारी शैलेश सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत सकाळी अकरा वाजता सभापती पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम सुरु झाला. या सभेसाठी प्रभारी सभापती तानाजी कट्टे, कविता जगदाळे, रमेश पाटोळे, नितीन राजगे, विजयकुमार मगर, तानाजी काटकर, अपर्णा भोसले, लतिका वीरकर, रंजना जगदाळे व चंद्रभागा आटपाडकर हे सदस्य उपस्थित होते. सभापतीपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला असल्याने सर्व प्रवर्गातून निवडून आलेल्या महिलांना संधी होती. सव्वा अकरा वाजता वरकुटे म्हसवड गणातून इतर मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गातून निवडून आलेल्या लतिका वीरकर यांनी सभापती पदासाठी आपला अर्ज गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांचेकडे दाखल केला. या अर्जावर सुचक म्हणून तानाजी काटकर यांनी स्वाक्षरी केली. दिलेल्या वेळेत फक्त लतिका वीरकर यांचा एकमेव अर्ज आला. छाननीत सदर अर्ज वैध ठरल्याने दुपारी बारा वाजता लतिका विरकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे पिठासन अधिकारी शैलेश सुर्यवंशी यांनी जाहीर केले.लतिका वीरकर यांच्या रुपाने प्रथमच पंचायत समितीच्या सभापतिपदी रासपला संधी मिळाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक राष्ट्रवादी व रासप युतीने एकत्रित लढली होती. लतिका वीरकर ह्या वरकुटे म्हसवड या गणातून इतर मागास प्रवर्ग महिला या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत. माण पंचायत समितीच्या दहा सदस्यांमध्ये आमदार जयकुमार गोरे गटाचे तीन, शेखर गोरे गटाचे तीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन, रासपचा एक व अनिल देसाई गटाचा एक असे सकृतदर्शनी बलाबल आहे.मात्र माजी सभापती कविता जगदाळे व विजयकुमार मगर हे एका बाजूला तर उर्वरित सर्व आठ सदस्य दुसर्‍या बाजूला असे चित्र होते. आठ सदस्यांना एकत्रित आणण्यात व ठेवण्यात लतिका वीरकर यांचे पती रासपचे नेते बबन वीरकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष, आमदार महादेव जानकर हे माण तालुक्यातील पळसावडे गावचे आहेत. त्यांच्या तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाला पहिल्यांदा माण पंचायत समितीचे सभापती पद मिळाले आहे.



असा योगायोग...
२००९ मध्ये माण पंचायत समितीचे सभापती पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असताना पिंगळी बुद्रुकच्या उर्मिला जगदाळे
यांना सभापती पदाचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा द्यावा लागला होता. तर यावेळी पिंगळी बुद्रुकच्याच असलेल्या कविता जगदाळे यांच्यावर अविश्वास ठराव मंजूर झाल्याने त्यांना सभापती पदावरून पायउतार व्हावे लागले. दोघीही महिला सभापती आपला कार्यकाळ पूर्ण करु शकल्या नाहीत. तर दोन्हीवेळी सभापतिपदी इतर मागास प्रवर्गातील महिलेला संधी मिळाली.