तिस-या संभाव्‍य लाटेत बालकांना असलेला धोका लक्षात घेता मनपाने बाल रूग्‍ण्‍णालय स्‍थापन करावे – आ. सुधीर मुनगंटीवार



चंद्रपूर शहर महानगरपालिकेने आसरा कोविड रूग्‍णालय कोरोना रूग्‍णांच्‍या सेवेत रूजु केले ही निश्‍चीतच कौतुकाची बाब आहे. जे या रूग्‍णालयात उपचारासाठी येतील ते लवकर बरे होवून सुखरूप घरी जावो अशी प्रार्थना मी चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकालीला करतो. आरोग्‍य संसाधनांच्‍या अभावी १२०० च्‍या वर मृत्‍यु जिल्‍हयात झाले आहेत. कोरोनाची तिसरी लाट येणार असल्‍याचा अंदाज तज्ञांनी व्‍यक्‍त केला आहे. या लाटेल लहान मुलांना धोका संभवणार असल्‍याचेही तज्ञांचे मत आहे. मनपाच्‍या माध्‍यमातुन उपाययोजना म्‍हणून बालकांसाठी एक रूग्‍णालय तयार करावे, सीएसआर च्‍या माध्‍यमातुन निधी घेवून कोरोनाच्‍या या लढयात उत्‍तम कार्य करावे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक १८ मे रोजी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्‍या आसरा कोविड रूग्‍णालयाचे उदघाटन आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या हस्‍ते संपन्‍न झाले. यावेळी जिल्‍हयाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व नगरविकास राज्‍यमंत्री प्राजक्‍त तनपूरे यांनी ऑनलाईन उपस्थित राहत शुभेच्‍छा दिल्‍या. कार्यक्रमाला खासदार बाळू धानोरकर यांची प्रत्‍यक्ष उपस्थिती होती. कार्यक्रमाला महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, स्‍थायी समिती सभापती रवि आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, नगरसेवक संजय कंचर्लावार सुभाष कासनगोट्टूवार, शिला चव्‍हाण, मनपा आयुक्‍त राजेश मोहीते, विनोद दत्‍तात्रय आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, चंद्रपूर शहर महानगरपालिकेने शहराच्‍या सौंदर्यीकरणासाठी भरीव कार्य केले आहे. अमृत योजनेच्‍या माध्‍यमातुन पाणी पुरवठयाच्‍या प्रश्‍नासंदर्भात उपाययोजना केली आहे. कोरोनाच्‍या पहिल्‍या लाटेत गोरगरीबांना मदती संदर्भात देखील उत्‍तम कार्य केले आहे. यापुढे त्‍यांनी आरोग्‍याच्‍या क्षेत्रात उत्‍तम काम करावे असेही ते म्‍हणाले.
कोरोना काळात समाजातील सर्वच घटक आपआपल्‍या परिने योगदान देत आहेत. कोविड रूग्‍णालय स्‍थापन करून त्‍या माध्‍यमातुन महानगरातील कोविड रूग्‍णांना आरोग्‍य सेवा देण्‍याचा महानगरपालिकेचा पुढाकार अभिनंदनीय असल्‍याचे खा. बाळू धानोरकर म्‍हणाले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मनपा आयुक्‍त राजेश मोहीते यांनी केले. सोशल डिस्‍टन्‍सींग पाळत नगरसेवक, डॉक्‍टर्स, परिचारीका, मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.