चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक वाळूघाटातून वाळूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना अवैध वाळूतस्करांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्यानुसार शनिवारी (ता. २२) रात्रीच्या सुमारास पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भिमणी घाटावरून अवैधरित्या वाळूची तस्करी करणारे दहा वाळूचे ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. यासर्व वाळूतस्करांवर गुन्हे दाखल करून ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या या कारवाईने वाळूतस्करी करणा-यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात अवैध वाळूतस्करांवर पाळत ठेवण्यासाठी पथक गठित करण्यात आले आहे. शनिवारी रात्री पोंभुर्णा तालुक्यातील अंधारी नदीच्या भिमनी घाटातून अवैधरित्या वाळूची तस्करी केली जात असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी भिमनी घाटावरून वाळूतस्करी करणा-यांवर कारवाई करण्याच्या सूचना आपल्या पथकाला दिल्या.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक भिमणी घाटावर धडकले. यावेळी घाटातून वाळूचा उपसा करताना दहा ट्रॅक्टर आढळून आले. कागदपत्रांची तपासणी केली असता कुणाकडेही कागदपत्रे नव्हती. त्यानंतर विनय गंगाधर आलाम (वय २९, रा. फुर्डीहेटी), तुषाल रामदास पिंपपळकर (वय २२, रा. फुर्डीहेटी), सचिन वासुदेव गौरकार (वय ३०, रा. वासनकौठी), विजय श्रीनिवासी आत्राम (वय ३६, रा. भिमनी), रोशन भगिरथ नरसपुरे (वय २६, रा. वेळवा), स्वप्नील शंकर पिंपपळशेंडे (वय २७, रा. चेक ठाणेवासना), गोपीनाथ भगवान सिडाम (वय ३५, रा. चेक खापरी), पुरुषोत्तम दिलीप पिदूरकर (वय ३६, रा. मोहाडा), दीपक कातरूजी शुभ्रत्कर (वय ३०, रा. घाटकुळ), राजू काशिनाथ गोंधळी (वय ३५, रा. पोंभुर्णा) या वाळूतस्करांविरुद्ध पोंभुर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून सर्व ट्रॅक्टर जप्त करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अुतल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलिस उपनिरीक्षक संदीप कापडे, खनके, साळवे, भुजाडे, बल्की, गोहोकार, जांभुळे, डांगे, जमीर, मोहुर्ले यांच्या पथकाने केली.