स्थानिक गुन्हे शाखेने आवळले पाच दारु तस्करांच्या मुसक्याचंद्रपूर शहरातील रामनगर पोलिस ठाणे हद्दीत दारूतस्करांविरुद्ध एकाच रात्री तीन कारवाया करण्यात आल्या. यावेळी १६ लाखांचा मुद्देमाल जप्त करीत पाच तस्करांना बेड्या ठोकल्या. दारूतस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीनंतर पोलिस अधीक्षक अरqवद साळवे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्त्वात या कारवाया करण्यात आल्या.
शहरातील रामनगर चौकात नाकाबंदी करीत पहिली कारवाई करण्यात आली. यावेळी एमएच ३४ एम ९९३५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाची तपासणी केली. यावेळी शक्ती संजू शाह (वय ३७, रा. बायपास रोड), लक्ष्मीनारायण पुतान परसराम (वय ३५, रा. अष्टभुजा वॉर्ड), रवींद्र विजय गुजर (वय ३०, रा. अष्टभुजा वॉर्ड) हे तिघे वाहनात होते. वाहनातून विदेशी दारूचा साठा आढळून आला. पोलिसांनी वाहन आणि दारूसाठा असा सुमारे दहा लाख तीन हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
रेल्वेस्थानक चौकात दुसरी कारवाई करीत साजिद इसाक कुरेशी (वय ३१, रा. शास्त्रीनगर, वणी) याला अटक केली. हा एमएच २९ एम ५९६७ क्रमांकाच्या आटोने दारूची तस्करी करीत होता. यावेळी दीड लाख रुपये किमतीची देशी दारू, बिअर असा सुमारे दोन लाख चार हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच जनता कॉलेज चौकात तिसरी कारवाई करण्यात आली. यावेळी एमएच ३४ बीबी १४७२ क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून दारूतस्करी केली जात होती. पोलिसांनी वाहनाची तपासणी करीत एक लाख रुपये किमतीची देशी दारू आणि वाहन असा सहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी चालक ईश्वर रमेश वाघमारे (वय २६, रा. हॉस्पिटल वॉर्ड, चंद्रपूर) याला अटक केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाई अवैध दारूतस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.