पालकमंत्री वडेट्टीवार यांनी घेतला ब्रम्हपुरी येथील विकास कामांचा आढावा
चंद्रपूर, दि. 17 फेब्रुवारी : ब्रम्हपुरी येथील विकास कामांच्या प्रगती संदर्भात पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विश्रामगृह येथे आढावा घेवून अधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या.
यावेळी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी पुरग्रस्तांचा शिल्लक निधी तातडीने संबंधीत पात्र लाभार्थ्यांना वितरीत करण्याचे निर्देश दिले. तसेच ब्रम्हपुरी व सिंदेवाही येथील क्रिडा संकुलाची माहिती घेवून या ठिकाणी हॉकी ग्राऊंड व क्रीकेट ग्राऊंड चे बांधकामाबाबत आवश्यक फेरबदलासह सुधारित नियोजन करण्याच्या सूचना केल्या. तर नगरपरिषदेने ब्रम्हपुरी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी आवश्यक निधीची मागणी करण्याचे सांगितले.
आरोग्य विभागाने ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात अद्यावत शल्यचिकित्सागृहसोबतच सुसज्ज उपकरणे व रुग्णालयाच्या सुंदर व देखण्या वास्तुनिर्मितीकरिता नियोजन करण्याच्या सूचना केल्या. यावेळी त्यांनी कृषी, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, पाटबंधारे, नगरपालीका, महसुल इ. विभागाचा आढावा घेतला.
याप्रसंगी नगराध्यक्षा रिता उराडे, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, उपविभागीय पोलीस अधिकारी मिलींद शिंदे, कृषी उपसंचालक रविंद्र मनोहरे व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.