चंद्रपूर, दि. 13 फेब्रुवारी : कोरोना फ्रंटलाईन वर्कर म्हणून आज जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, यांनी कोरोना आजारावरील कोविशिल्ड ही लस आज जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लसीकरण केंद्रात घेतली. कोविशिल्ड लस पुर्णत: सुरक्षीत आहे, लसमुळे जिल्ह्यात आतापर्यत कुणालाही गंभीर रिॲक्शन झाल्याचे आढळून आलेले नाही. आम्ही लस घेतली, नोंदणी केलेल्या सर्व फ्रंटलाईन वर्कर यांनीदेखील कोणत्याही अफवांना बळी न पडता लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी व्यक्त केले.
चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना रूग्णांचे प्रमाण सध्या कमी असले तरी मागील काही दिवसांपासून अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा इ. शहरात कोविड रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्यामुळे कोविड-19 पुर्णपणे संपला या मानसिकतेतून सर्वांनी बाहेर येण्याची गरज असून सतत मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा वापर केला तरच कोविडपासून आपण सुरक्षीत राहू शकू असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी सांगितले.
कोविड व्हॅक्सीनचा आज पहीला डोस घेतला, काहीही त्रास झालेला नाही, नियमांचे पालन केल्यास कोरोनावर मात करणे शक्य असल्याची प्रतिक्रीया जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सांगितले की लस देणारे आरोग्य सेवक प्रशिक्षीत असल्याने कुठलाही त्रास झाला नाही. 28 दिवसांनी लसीकरणाचा दुसरा डोस दिल्या जाईल व त्यापुढे 14 दिवसानंतर कोरोनाच्या ॲन्टीबॉडीज शरीरात तयार होतील. त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोनाचे त्रीसुत्री नियम पाळण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. ज्यांचे नाव लसीकरणाचे मोहिमेत समाविष्ट केले आहे, त्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी लस टोचून घ्यावी व कोविडच्या युद्धात सहभागी व्हावे, असे आवाहन राहुल कर्डिले यांनी केले.
लस सुरक्षीत आहे, कोरोनाचा प्रभाव कमी झालेला नाही, मास्कचा वापर, हात धुणे व अंतर राखणे ही त्रिसुत्री पाळूनच आपण कोरोनाविरूद्धच्या युद्धात जिंकू शकतो, अशी प्रतिक्रीया अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी यावेळी दिली.
जिल्ह्यातील 7755 फ्रंटलाइन वर्करांची कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यात आली असून कालपर्यंत 3059 कोरोना योद्धांना लस देण्यात आली आहे. तत्पुर्वी 12 हजार 91 आरोग्य सेवकांना कोरोना लस देण्यात आली आहे.
यावेळी उपजिल्हाधिकारी जनार्दन लोंढे, तहसिलदार यशवंत धाईत यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालय व इतर कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कोविशिल्ड लस घेतली. आरोग्य सेविका चंदा डहाके या प्रशिक्षीत आरोग्य सेवीकेने त्यांना लस दिली. यावेळी जिल्हा शासकीय रूग्णालायाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, राजेंद्र सुरपाम, लसीकरण अधिकारी संदिप गेडाम व जिल्हा सामान्य रूग्णालयातील लसीकरण कर्मचारी वृंद हजर होते.