सरपंच संसदेचे जि.प.अध्यक्षा सौ.संध्याताई गुरनुले यांना निमंत्रण



चंद्रपूर : एम.आय.टी. स्कूल ऑफ गव्हर्नमेंट अंतर्गत सरपंच संसदेच्या विद्यमाने कोविडच्या प्रभाव पातळीचा अंदाज घेऊन फेब्रुवारी, 2021 च्या पहिल्या पंधरवाडयात महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद अध्यक्षांना एमआयटीत निमंत्रित करून एक दिवसीय महाराष्ट्र राज्य - जिल्हा परिषद अध्यक्ष परिषद घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना प्रत्यक्ष भेटुन या परिषदेविषयी तसेच एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या कायद्याविषयी चर्चा करण्यासाठी निमंत्रण दौरा "राष्ट्रीय सरपंच संसदे" नंतर लगेच 8 डिसेंबर, 2020 पासुन चालु करण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. संध्याताई गुरुनुले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निमंत्रण देण्यात आले व "सरपंच संसद" उपक्रमांविषयी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी एमआयटी महाराष्ट्र सरपंच संसदेचे प्रमुख समन्वयक योगेश पाटील, प्रांत समन्वयक श्री. व्यंकटेश जोशी, नागपूर विभाग समन्वयक विनय दाणी, नाशिक विभाग समन्वयक संजय भांबरे यांची उपस्थिती होती.

सरपंच संसदेचे चंद्रपूर जिल्हा समन्वयक व जि.प.सदस्य श्री. संजय गजपुरे यांनी ही भेट घडवुन आणली. याप्रसंगी प्रमुख समन्वयक श्री. योगेश पाटील यांनी सौ. संध्याताई गुरुनुले यांचा शाल देऊन सत्कार केला व जि.प. मार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.