चंद्रपूर, दि. 28 : कापूस वेचल्यावर पराठी काढण्यासाठी श्रेडर यंत्राचा वापर केल्यास त्यामुळे पराठीचा भुगा होतो व कालांतराने ते जमिनीत कुजून सेंद्रिय कर्ब तयार होते. याचा उपयोग पुढच्या हंगामातील पिकांचे उत्पादन वाढीस होत असल्याचे कृषी सहसंचालक रवींद्र भोसले यांनी काल श्रेडरचे कापूस पिकातील फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगतांना केले.
मौजा टाकळी येथे कापूस फरदड निर्मूलन मोहिमे अंतर्गत राम दादाजी सन्मानवार यांच्या शेतात कापूस श्रेडर चे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी भोसले यांनी श्रेडरमुळे कपाशीची पराठी भुगा केल्यास गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडीत होऊन पुढील उत्पत्ती थांबते व पुढील हंगामात गुलाबी बोंड अळीचा किडरोग नियंत्रणात येतो असेही सांगीतले. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे त्यांनी निराकरण केले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान अंतर्गत राकेश रामटेके यांना सन 2017-18 मध्ये कापूस श्रेडर यंत्राचा लाभ देण्यात आला, याचा उपयोग ते तालुक्यातील फरदड निर्मूलनासाठी करत असल्याचे तालुका कृषी अधिकारी मोहिनी जाधव यांनी सांगितले.
यावेळी मंडळ कृषी अधिकारी उमाकांत झाडे, कृषी पर्यवेक्षक मारुती बर्वे, आनंद वाकडे, प्रवीण देऊळकर व परिसरातील शेतकरी उपस्थित होते.