वनाधिकारी राठोड व वनपाल रामटेकेंच्या चौकशीचे आदेश



चंद्रपूर : रेती भरलेले ट्रॅक्टर पकडल्यानंतर एका राजकीय व्यक्तीचे नाव घेवून बदनामी करीत असल्याच्या आरोपाखाली वरोऱ्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड व वनपाल विजय रामटेके यांच्याविरोधात वरोरा पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, संबंधित राजकीय व्यक्तीने विभागीय वनाधिकाऱ्यांकडेही यासंदर्भात निवेदन दिले असून, आरएफओ राठोड आणि वनपाल रामटेके यांच्या चौकशीचे आदेश साहाय्यक वनसंरक्षक एस. एल. लखमावाड यांना देण्यात आले असून, पाच दिवसात अहवाल सादर करण्याचेही आदेशात नमूद केले आहे. त्यामुळे आरएफओ राठोड आणि वनपाल रामटेके यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वरोरा वनपरिक्षेत्राची जबाबदारी वनपरिक्षेत्र अधिकारी मधुकर राठोड यांच्याकडे येण्यापूर्वी सावली व बफर झोनमध्ये त्यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त राहिली आहे. स्वत:च्याच कार्यालयातील अधिनस्त कर्मचाऱ्यांना प्रचंड मानसिक त्रास देण्याचे प्रकार त्यांच्याकडून घडले आहे. यामुळे अनेक कर्मचारी व अधिकाऱ्यांशी त्यांचे वाद झाले असून, सावलीतही या अधिकाऱ्याने मोठमोठे कारनामे केले आहे. आरएफओ राठोड यांची गडचिरोली जिल्ह्यातून सुरू झालेली कारकिर्द आतापर्यंतही वादातच गेली आहे. वरोऱ्यातही त्यांनी हेच प्रकार सुरू केले असून, काही दिवसांपूर्वी वरोरा तालुक्यातील शेगाव ते दादापूर मार्गावर रेती भरलेले ट्रॅक्टर त्यांनी पेट्रोलिंगदरम्यान पकडले. त्यावेळी एका राजकीय व्यक्तीचे नाव घेवून ते म्हणत असतील तर ट्रॅक्टर सोडतो, अशी अट घातली. दरम्यान, यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर त्या राजकीय व्यक्तीने वरोरा पोलीस ठाण्यात आपली बदनामी करीत असल्याबाबत आरएफओ राठोड आणि वनपाल रामटेकेविरूद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून राठोड आणि रामटेकेविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलिसांनी घेतली होती.

पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर त्या व्यक्तीने विभागीय वनाधिकारी कु. एस. व्ही. जगताप यांच्याकडेही वनपरिक्षेत्रातील अनागोंदी कारभाराचे निवेदन दिले होते. या निवेदनात आरएफओ राठोड आणि वनपाल रामटेके हे मानसिक त्रास देत असल्याचे नमूद करण्यात आले होते. आरएफओ राठोड यांच्या विरोधात वारंवार होणाऱ्या तक्रारींची दखल घेत विभागीय वनाधिकाऱ्यांनीही तत्काळ आरएफओ राठोड आणि वनपाल रामटेके यांच्या चौकशीचे आदेश ५ जानेवारी रोजी साहाय्यक वनसंरक्षक (तेंदू) एस. एल. लखमावाड यांना दिले होते. संबंधित चौकशी अधिकाऱ्यांना पाच दिवसांच्या अवधीत कार्यवाही करून अहवाल सादर करायचा होता. त्यामुळे आरएफओ राठोड आणि वनपाल यांच्या विरोधातील तक्रारी मोठ्या प्रमाणात वाढत असून, वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची गरज निर्माण झाली आहे. दरम्यान, आरएफओ राठोड यांच्याकडून यापूर्वी वनविभागातील कर्मचाऱ्यांना त्रास दिला जायचा. आता तर बाहेरील व्यक्तींनाही मानसिक त्रास देण्याचे प्रकार सुरू केल्याचे या प्रकरणावरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे त्यांची कोणत्याही क्षणी उचलबांगडी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.