नागपूर- मेट्रोने आपण प्रवास करीत असाल आणि स्थानकावर उतरल्यानंतर आपल्याला जवळपास कुठे जायचे असेल तर शहर बस सेवा आपल्या सेवेत राहतील. मेट्रोला आता शहर बसची कनेक्टिव्हिटी दिल्याने नागपूरकरांचा मेट्रोने प्रवास सुकर होणार आहे.
वर्धा मार्गावरील खापरी तसेच हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर या मेट्रोच्या स्थानकावरून पुढील प्रवासासाठी दर १५ मिनिटांनी शहर बसची व्यवस्था करण्यात आली आहे. मेट्रोला प्रवासी मिळावे म्हणून हे पाऊल उचलण्यात आले आहे. बुटीबोरी एम.आय.डी.सी. गेट येथून खापरी मेट्रोस्थानकासाठी सकाळी ७.०५ वाजतापासून तर खापरी स्थानकाहून बुटीबोरीसाठी सकाळी ७.५० वाजता पासून दररोज बस सोडण्यात येणार आहे. शेवटची बस बुटीबोरी येथून सांय. ७.१० मिनिटांनी तसेच खापरीहून बुटीबोरीसाठी ७.५५ मिनिटांनी सुटेल. हिंगणा येथून सकाळी ७.२५ मिनिटांनी व लोकमान्य नगर स्थानकापासून स. ८.१० मिनिटांनी बस सुटेल. सायंकाळी शेवटची फेरी ७.०० व ७.३० वाजताची असेल.
ऑटो मेट्रोच्या फीडर सेवेत दाखल!
कोरोनाच्या काळात ऑटो बंद होते. यामुळे त्यांच्यावर फार मोठे आर्थिक संकट ओढावले. या संकटातून बाहेर काढण्यासाठी मेट्रोने पुढाकार घेतला असून नागपुरातील ऑटोना मेट्रोच्या फीडर सेवेत दाखल करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
यासंदर्भात काही दिवसांपूर्वी टायगर ऑटो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी मेट्रोने फीडर सेवेचे सादरीकरण केले. महामेट्रो आणि ऑटो एकमेकांना कसे सहकार्य करू शकेल, याबाबत माहिती दिली. सध्या १६ मेट्रो स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू आहे. यातील प्रत्येक स्थानकावर एक ऑटोचालक मेट्रो मित्र म्हणून कार्यरत राहील. महामेट्रोने भारत राईड्ससोबत मेट्रो आणि ऑटो फीडरसेवेबाबत एक ॲप तयार करण्यासंदर्भात सामंजस्य करार केलेला आहे. या ॲपद्वारे मेट्रो प्रवाशांना त्यांच्या घरी ऑटो उपलब्ध होईल. मेट्रोने प्रवास केल्यानंतर याच ॲपद्वारे त्यांना घर किंवा कार्यालयाच्या पुढील प्रवासाकरिता सहजपणे ऑटो उपलब्ध होईल. या ॲपच्या माध्यमातून केवळ ऑटोच नव्हे तर जवळचे स्वच्छतागृह, पर्यटनस्थळ आदींचीही माहिती उपलब्ध होणार आहे. यामाध्यमातून महामेट्रो नागपूर शहरातील दोन हजार ऑटोचालकांना जोडणार आहे.