शिक्षक मतदारसंघात प्राथमिक शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी करण्याबाबत लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० मधील २७(३) कलमात दुरूस्ती होणेदृष्टीने राज्य सहकार्यवाह प्रकाश चुनारकर यांनी परिषद पातळीवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यांना निवेदन देण्याचे आवाहन केले.
त्यानुसार खासदार श्री.बाळूभाऊ धानोरकर यांना सौ.विजयालक्ष्मी पुरेड्डीवार महीला आघाडी प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद ( प्राथमिक) जिल्हा शाखा-चंद्रपूर यांचे नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा कार्यवाह अमोल देठे, सल्लागार अश्विनी ताटीपामूलवार, संघटनमंत्री सुशांत मुनगंटीवार, प्रसिद्धी प्रमुख सुनिल टोंगे,उर्दू विभाग प्रतिनिधी हुआ हबीब सैय्यद उपस्थित होते.
या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की शासन अधिसूचना सामान्य प्रशासन विभाग दि.८ आक्टोबर १९८५ मध्ये दुरूस्ती करण्यासंबंधी होती. या दुरूस्ती अधिसूचनेनुसार शिक्षण संचालक तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षण व उच्च शिक्षण मंडळ यांनी मान्यता दिलेल्या व शालांत परीक्षेला उमेदवार पाठविणाऱ्या शिक्षण संस्थांमधील शिक्षक मतदार म्हणून नोंदण्यास पात्र आहेत. राज्यामध्ये काही संस्थांमध्ये प्रथम वर्गापासून एच.एस.सी. पर्यंत एकाच संस्थेचे वर्ग चालवले जातात. काही संस्थांमध्ये प्राथमिक वर्ग स्वतंत्रपणे व माध्यमिक शिक्षण वर्ग स्वतंत्रपणे चालविले जातात. ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये फक्त प्राथमिक शिक्षण वर्ग चालवले जातात त्या संस्थेतील शिक्षक लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० मधील भाग २७(३) (ब) अनुसार पात्र नाहीत. म्हणजेच शिक्षक मतदारसंघासाठी जे शिक्षक माध्यमिक शिक्षण वर्गासाठी नेमलेले आहेत. तसेच शिक्षक मतदार म्हणून नोंदण्यास पात्र आहेत. म्हणून अशा संस्थेमध्ये प्रथम वर्गापासून शालान्त परिक्षेपर्यंतचे वर्ग चालविले जात असले तरी त्या शिक्षण संस्थेतील फक्त जे शिक्षक माध्यमिक शिक्षण वर्गाला शिकवितात तेच शिक्षक मतदार म्हणून नोंदण्यास पात्र आहेत. प्राथमिक वर्गाला शिकविणारे शिक्षक मतदार म्हणून नोंदण्यास पात्र नाहीत. त्यामुळे शिक्षक मतदार संघातील मतदार यादीपासून मतदार म्हणून प्राथमिक शिक्षक वंचित आहेत.