चार हायवासह जेसीबीवर एसडीओ घुगे यांची धडाकेबाज कारवाई



जिल्ह्यातील रेती तस्करीचे विस्तारलेले
जाळे तोडण्याचे आवाहन !

रेती तस्करीचे १0 हायवा ट्रक तहसीलमधून पळविले !

नागभीड : अवैध रेतीतस्करी करताना पकडलेले दहा हायवा ट्रक नागभीड तहसील कार्यालय परिसरातून त्याच रात्री तस्करांनी पळवून लावल्याने येथील महसूल विभागात खळबळ उडाली आहे. गुरुवारी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या परिसरात आणून ठेवलेले दहा ट्रक शुक्रवारी सकाळीच गायब झाल्याचे दिसून आले. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील कान्पा येथे भंडारा जिल्ह्याच्या खनिकर्म अधिकाऱ्यांनी अवैध रेती तस्करी करणारे हे दहा ट्रक पकडले होते. सदर भाग हा चंद्रपूर जिल्ह्यात येत असल्याने त्यांनी पुढील कारवाईसाठी दहाही ट्रक नागभीड तहसील कार्यालयाच्या सुपूर्द केले होते. दरम्यान, नागभीड तहसील कार्यालयाच्या पथकाने सदव दहा ट्रक जप्त करून तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आणून ठेवले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळीच सर्व ट्रक गायब झाल्याचे दिसून आले. तस्करांनी रात्रीच ट्रक पळवून नेल्याची माहिती नागभीडचे नायब तहसीलदार संदीप भांगरे यांनी दिली आहे. तहसील कार्यालयातून ट्रक पळविण्यापर्यंत तस्करांची मजल गेल्याने यात महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. विशेष म्हणजे, यातील एकाही तस्कराचे किंवा चालकाचे नाव महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना माहित नाही. याप्रकरणी तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.


चंद्रपूर : नुकतेच दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर चे उपविभागीय अधिकारी रोहण घुगे यांनी चार हायवासह जेसीबीवर रेती तस्करासंदर्भात कारवाई केली आहे. एमएच ३४ बीजी-९९५०, एमएच ४० एके२१०२ आणि एमएच ३४ एबी-४०८५ या तीन हायवावर कारवाई करून त्या जप्त करण्यात आल्या आहेत. यातील एमएच ३४-बीजी-९९५० हे वाहन शैलेश केळझरकर यांच्या मालकीचे आहे तर एमएच ४०-एके-२१०२ हा हायवा संतोष खोपडे च्या नावावर रजिस्टर्ड असून आशीष ठाकूर हा व्यावसायिक रेती तस्करीसाठी हे वाहन वापरत असल्याचे सांगण्यात येत आहे. तर एमएच-३४-एबी४०८५ हे वाहन सोनू सिंग च्या मालकीचे आहे. या तिन ही वाहनांवर चंद्रपूर चे उपविभागीय अधिकारी रोहण घुगे यांच्या नेतृत्वात कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे हायवा नदीतून रेती भरून चंद्रपुरात येत असतांना सदर कारवाई करण्यात आली आहे. नागपूर मार्गावरील इरई नदीघाटावर करण्यात आली यामध्ये एमएच-४०-एके-६९२८ या हायवामध्ये रेती भरतांना या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे रेती तस्करीमधील वाहनांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई करण्यात येते. ट्रॅक्टर वर १ लाख ८ हजार, हायवा २ लाख ५० हजार तर जेसीबीवर ७ लाख ५० हजारांचा दंड आकारण्यात येतो. दंडाची ही रक्कम दिसायला मोठी दिसत असली तरी एकदा कारवाई झाल्यानंतर न्यायालयातून वाहन मालक आपले वाहन सोडवून वर्षभर यातून रेती ची धुलाई करण्यात व्यस्त असतो. त्यामुळे रेती तस्करीतील वाहन जप्त झाले तरी वाहन मालकाला व रेती तस्करांवर होणारी ही कारवाई या व्यवसायावर निर्बंध आणण्यासाठी पुरेसी नाही.
मागील एक वर्षापासून चंद्रपूर जिल्ह्यात रेती तस्करीने आपले डोके वर काढले आहे. नद्यानाल्यांमधून रेती पोखरू-पोखरू काढण्यात येत आहे. मोठ-मोठे खड्डे रेती तस्करांनी नद्या-नाल्यांमध्ये करून ठेवले असून ज्याठिकाणी रेती संपली आहे, त्याठिकाणाहून ही माती दिसेपर्यंत खोदण्यात येवून रेती मिश्रीत माती काढण्यात येत आहे. वाहत्या नद्या-नाल्यांमधून जेसीबी-पोकलँड च्या सहाय्याने काढण्यात येणाऱ्या या रेतीमुळे नदीचे प्रवाह बदलला असल्याचे अनेक ठिकाणी बघायला मिळत आहे. जिल्ह्यातील विस्तारलेल्या रेती तस्करांचे जाळे तोडण्याचे मोठे आवाहन प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.