नागपूर, 27: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व नि: पक्षपणे पार पाडण्याचे निर्देश विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी आज दिले. निवडणूक निरिक्षक एस.आर व्ही. श्रीनिवासन यांनी या प्रशिक्षण कार्यक्रमाला भेट दिली.
यावेळी विभागीय आयुक्त यांनी मतमोजणी दरम्यान अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतप्रदर्शन करु नये, चोख व शिस्तबध्द पध्दतीने काम करुन निवडणूक मतमोजणी प्रक्रिया अचूक व योग्य रितीने पार पाडण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
२ डिसेंबरला निवडणुकीच्या मतमोजणीचे प्रात्यक्षिक ( मॉकड्रिल ) होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भात मतमोजणीचे तिसरे प्रशिक्षण कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. निवडणूक निरीक्षक एस.आर व्ही. श्रीनिवासन, नागपूर विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. ही निवडणूक प्रक्रिया थोडी वेगळी असल्याने संबंधितांनी मोबाईल व्हॉटस्ॲप ग्रूपवर सहभागी होऊन याबाबत चर्चा करुन प्रक्रिया समजून घ्यावी, असे आयुक्तांनी सांगितले.
3 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणी प्रक्रियेची माहिती निशिकांत सुके यांनी सादरीकरणातून संबंधितांना दिली. मतमोजणीच्या वेळी 28 टेबल राहणार आहेत. प्राथमिक मतमोजणीत पोस्टल बॅलेट पेटीतील सर्व बॅलेट खाली करुन डिक्लेरेशन व पोस्टल बॅलेट वेगवेगळे करावे. डिक्लेरेशन नसल्यास, फाटले असल्यास, संशयित असल्यास ते वेगळ्या पेटीत ठेवावे. नंतर त्यांची योग्य तपासणी करुन सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
निवडणूक आचारसंहितेचे पालन करुन मतमोजणीच्या वेळी कोणतीही चूक होणार नाही यावर बारीक लक्ष द्यावे. मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल किंवा टॅब नेण्यास मनाई राहणार आहे. याची पर्यवेक्षक व निवडणूक प्रतिनिधी यांनी दक्षता घ्यावी. प्रत्येक टेबलवर बॅलेट पेटी राहणार असून मतमोजणी प्रक्रिया सकाळी 7.30 वाजतापासून सुरु होणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधीसोबत कोणतीही चर्चा करुन मतप्रदर्शन करु नये. कोणताही वाद उत्पन्न होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे सांगण्यात आले.
बॅलेट पेटीमधील बॅलेट उघडे करु नये, तसेच फोल्ड करुन मतमोजणी करावी. मतमोजणी अधिकाऱ्यांनी मतपत्रिकेबाबत माहिती क्षेत्रनिहाय द्यावी. तसेच मोजणी करतांना आवश्यक ती काळजी घ्यावी. ही माहिती 16 क्रमांकाच्या नमुन्यात भरावी. विस्तृत मतमोजणीमध्ये १ हजार बॅलेट पेपर राहणार आहेत. त्यातील संशयात्मक मतपत्रिका वेगळ्या करण्यात येणार आहेत. या निवडणुकीत एकूण 19 उमेदवार असल्याने 19 पेट्या असणार आहेत व संशयात्मक मतपत्रिकेसाठी एक पेटी अशा 20 पेट्या राहणार आहेत. प्रथम पसंतीच्या मतास मतमोजणीत प्राधान्य देण्यात येऊन नंतर इतर पसंतीक्रमानुसार मतमोजणी होणार आहे. ही प्रक्रिया थोडी क्लिष्ट असल्याने मतमोजणी करणाऱ्यांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. मतपत्रिकेत शब्दात पसंती लिहणाऱ्या मतदार, पसंतीक्रम एकाच उमेदवारांच्या समोर 1,2,3 असा क्रम लिहिल्यास ते मत अवैध समजले जाणार आहे. मतदार केंद्रात असलेल्या जांभळया शाईच्या पेनाने पसंती क्रम लिहावा.अन्य पेनने लिहिल्यास मत अवैध होईल. प्रथम पसंती दर्शविली नसल्यास मत अवैध होणार आहे. तसेच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करणा-या मतदारास कोणत्याही पेनने पसंती दर्शविली तरी मत वैध ठरविण्यात येणार आहे. हे अपवादात्मक आहे. मतमोजणी प्रक्रियेत 25 मतपत्रिकेचे गठ्ठे राहणार असून त्यावर चेकलिस्ट जोडण्यात येणार आहे. मर्यादित मतदार असल्याने या निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व राहणार आहे. कोट्यानुसार विजयी उमेदवार घोषित करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणास नागपूर विभागातील निवडणुकीशी संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पदवीधर मतदारसंघ निवडणूक अंतिम टप्प्यात असून १ डिसेंबरला मतदान होणार आहे. ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. यासाठी प्रशासन तयारीत आहे.