▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

गंभीर रुग्णांचे सीटी स्कॅन रुग्णालयातच करा पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार



चंद्रपूर दि.13 ऑक्टोबर: खाजगी रुग्णालये व सिटीस्कॅन सुविधा असलेल्या केंद्रांद्वारे रुग्णांकडून सिटीस्कॅन करण्यासाठी अवाजवी रक्कम आकारली जाते. त्यामुळे गंभीर कोरोना बाधित रुग्णांचे सिटीस्कॅन रुग्णालयातच करण्याच्या सूचना राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आरोग्य विभागाला दिल्यात. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा व कोरोना रोखण्यासाठी प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतांना श्री.वडेट्टीवार बोलत होते.

यावेळी, आमदार किशोर जोरगेवार, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, मनपा आयुक्त राजेश मोहिते, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अरुण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा दर कमी होत असून बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही वाढ होत आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचा रिकव्हरी रेट 75 टक्के आहे तर डबलींग रेट 48.9 आहे. तसेच टेस्ट करण्यात इतर जिल्ह्याच्या तुलनेत चंद्रपूर जिल्हा नागपूर विभागात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कोरोना आजार बरा होऊ शकतो ही भावना समाजात रुजविणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

जिल्ह्यात स्त्री रुग्णालयांमधील शंभर खाटांचे काम पूर्ण झालेले असून 350 खाटांचे काम येत्या वीस ते पंचवीस दिवसात पूर्णत्वास येईल. तसेच द्रव प्राणवायू प्रकल्प उभारणीसाठी कार्यादेश दिला असून येत्या आठ दिवसात ऑक्सिजन जनरेशन सुरू होईल. तसेच जिल्ह्यात ॲम्बुलन्स मागणीसाठी सुद्धा प्रस्ताव त्वरित सादर करण्याच्या सूचना श्री .वडेट्टीवार यांनी दिल्यात.


माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात 95 टक्के सर्वेक्षण पूर्ण झालेले असून रुग्णांची मोठ्या प्रमाणात आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये आयएलआय व सारीचे 2309 रुग्ण सापडले असून 265 कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली आहे. या मोहिमेची व्याप्ती वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी होर्डिंगवर प्रचार व प्रसिद्धी करावी.
प्रत्येक भागात त्या-त्या भाषेनुसार माहिती देणारे पत्रके तर गावागावात प्रत्येकाच्या घरावर स्टिकर्स व पोस्टर लावावेत. तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या प्रचार प्रसिद्धीसाठी जिल्ह्यात स्लोगन देणारी स्पर्धा राबवावी अशा सूचना सुद्धा आरोग्य विभागाला दिल्या.
जिल्ह्यात फिजिशियनची उपलब्धता आहे. डॉक्टरांची पाळी प्रमाणे कार्य सुरू असुन कॉलवर सुद्धा डॉक्टर उपलब्ध होत आहे. डब्ल्यूसीएल, एसीसी सिमेंट, या संस्थेकडून 16 डॉक्टर व स्टाफनर्सची सेवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिग्रहित करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी यावेळी दिली.
सिंदेवाही व सावली तालुक्यात दोन क्लस्टर युनिट तयार करण्याचे नियोजन असून त्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळणे शक्य होईल.जिल्ह्यातील महिलांना त्यांच्या तयार वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी एक हेक्टर जागेवर 50 गाळे काढून देता येईल, त्या जागेवर बांधकाम करताना ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांसाठी राहण्याची सोय उपलब्ध करता येईल असे नियोजन करून जागेसंबंधी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिल्या.