चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून "हत्यां"चे सत्र आणि अपराधी प्रवृत्ती यामध्ये भयंकर वाढ झाली आहे. जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अपराधी प्रवृत्तीच्या मानसिकतेने मोठ्या प्रमाणात डोके वर काढले आहे. यासंदर्भात नुकतेच गुरूवार दि. 1 ऑक्टोंबर रोजी पालकमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात गुंड प्रवृत्तींना ठोकून काढा असे निर्देश पोलीस अधीक्षकांना देणार असल्याचे सांगून ज्यांचेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशांवर त्वरित कारवाई करा. कायदा व सुव्यवस्थेला धोका निर्माण करणाऱ्यांवर, तो कितीही मोठा असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे, त्यांना ती कितीही मोठे असले तरी ठोकून काढण्यात यायला हवे. कायदा हातात घेणारा जिल्ह्यामध्ये सुटणार नाही. असे निर्देश पोलिस अधीक्षकांना देण्यात येणार असल्याचे पत्रकारांच्या प्रश्नाच्या उत्तरात पालकमंत्र्यांनी सांगितले. गुन्हेगारी प्रवृत्तीचा कोणीही आता जिल्ह्यात सुटणार नाही. जो गुन्हेगार आहे त्यांना उचला व त्यांच्यावर कडक कारवाई करा, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात येणार असल्याचे पत्रकार परिषदेमध्ये नाम. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.
मागील काही दिवसापासून जिल्ह्यामध्ये घडलेल्या अपराधिक घटना ही जिल्ह्यासाठी चिंतेची बाब आहे. अपराधी प्रवृत्तीच्या मानसिकतेने मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात डोके वर काढले असून चंद्रपूर जिल्हा हा अत्यंत शांतप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जात होता परंतु त्यावर आता प्रश्नचिन्ह उभा राहणार, असेचं चित्र दिसत आहे. यासंदर्भात पत्रकारांनी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री व अन्य आमदारांच्या उपस्थितीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर पालकमंत्र्यांनी आपली रोखठोक भूमिका व्यक्त केली.