उर्जानगर येथील "ती" घटना वनविभागाच्या "कर्तव्यशुन्य" कारभाराला नागडे करणारी !
मागील महिन्यामध्ये चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन येथील भर वस्तीतील पर्यावरण चौकात सायंकाळच्या वेळेस चिमुकल्या पाच वर्षीय "लावण्या"चा बिबट ने बळी घेतला. ज्या ठिकाणी ही घटना घडली तो चौक ऊर्जानगर येथील ऐन वस्तीत आहे. बिबट्याने घेतलेला चिमुकली "लावण्या"चा बळी वनविभागाच्या "कर्तव्यशून्य" कारभाराला नागडी करणारी घटना आहे. यानंतर चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन व वनविभाग एकामेकांवर ताशेरे ओढत आहे, परंतु निर्दोष चिमुकलीचा बळी गेला याला दोषी कोण ? यावर गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या परिसरात हिंस्त्र जंगली प्राण्यांचा नेहमी वावर असतो. हिंस्त्र जंगली प्राण्यांवर नियंत्रणाची जबाबदारी ही वनविभागाची आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रोटेक्शन फंड म्हणून चंद्रपुर थर्मल पावर स्टेशन वनविभागाला काही निधी देत होता, यातून वनविभाग हिंस्त्र जनावरे ऊर्जा नगर परिसरात येऊ नये यासाठी वन मजूर लावत होते परंतु काही दिवसापासून हे मजूर लावण्यात आले नाही असे सांगण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे वन विभागाचे पायली व सिटीपीएस असे दोन बीट आहेत. ताडोबाला लागून असलेला हा परिसर या दोन्ही बीटांकडे असून याचा कारभार दोन वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडे आहे.

ऊर्जानगर परिसराची वन्य प्राण्यांपासून संरक्षणाची जबाबदारी ही वनविभागाच्या स्थानिक बीट गार्ड व रॅपिड रिस्पॉन्सिबिलिटी ची आहे. वन विभागाचे रॅपिड सेक्शन (अति शिघ्र कृती दल) व स्थानिक बिट गार्ड ची जबाबदारी ही गस्त घालण्याची आहे. परंतु या गस्ती पथकातील वनरक्षक (स्थानिक बीट गार्ड) हे रेंज ऑफिस मध्ये वेळ घालवतात, मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार उर्जा नगर परिसरात गस्त घालण्याची जबाबदारी असलेले स्थानिक बीट गार्ड रेंज आॅफिसमध्ये मोबाईल वर लुडो व सट्टासारखे खेळ खेळत असल्याचे सांगण्यात येते, या बाबीला काही वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
तसेच वाघाचे पिंजरे व कॅमेरे लावून आपली जबाबदारी झटकण्याचे शर्मनाक कार्य वनविभागाच्या माध्यमातून होत आहे. निधी नाही म्हणून गस्त नाही अशी भूमिका वनविभागाची आहे तर विद्युत निर्माण करण्याचे कार्य हे चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन ची आहे. हिंस्त्र प्राण्यांवर नियंत्रण ठेवणे ही आमची जबाबदारी नाही ती वनविभागाची आहे अशी माहिती चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन अधिकाऱ्यांनी दिली.
चंद्रपूर सुपर थर्मल पावर स्टेशन च्या आजूबाजूला झाडेझुडपे वाढली आहे ती साफ करण्यात यावी या संदर्भात वन विभागाने व्यवस्थापनाला कळविली होती, परंतु अशी साफसफाई न करण्यात आल्यामुळे सदर दुर्घटना घडली अशी भूमिका वनविभागाने घेतली असून या चालढकल मधील एका निर्दोष बालिकेला वन्य प्राण्यांचे शिकार व्हावे लागले, ही शोकांतिका आहे. स्टेशनच्या परिसरात अशा घटना नेहमीच झालेले आहेत दुर्घटना घडल्यानंतर वन विभागाला जाग येते असा आरोप आता होऊ लागला आहे. वाघाचे पिंजरे व कॅमेरे लावून वन्य प्राण्यांपासून जिवाची सुरक्षा होऊ शकत नाही. वन्य प्राण्यांवर नियंत्रणाची जबाबदारी वन विभागाची असून वन विभागाचे अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहे. चंद्रपूर सुपर थर्मल पॉवर स्टेशनच्या परिसरात हे बरंय प्राणी शिरकाव करीत असून त्यावर योग्य तो उपाय त्वरित करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.