पालकमंत्र्यांच्या मध्यस्तीनंतर अखेर प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन मागे !



चंद्रपूर : औष्णिक वीज केंद्राच्या चिमणी वर चढलेले ७ प्रकल्पग्रस्त १० दिवसांच्या आंदोलनानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास खाली उतरले. आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्या यशस्वी शिष्टाईनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. सिटीपीएस विश्रामगृहावर ऊर्जा मंत्री डॉ.नितीन राऊत यांच्याशी यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दूरध्वनीवर चर्चा केली. प्रकल्पग्रस्तांची लवकरच ऊर्जा मंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्यामध्ये यासंदर्भात अंतिम तोडगा निघणार आहे.
तथापि,या वेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनकर्त्यांना सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.


मुख्य अभियंता राजू घुगे यांची तडकाफडकी बदली, पंकज सपाटे नवे मुख्य अभियंता !
मुंबई महानिर्मितीद्वारे निर्गमित झालेल्या स्थानांतरण आदेशाद्वारे चंद्रपूर महाऔष्णिक वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांची भुसावळ येथे तर भुसावळचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांची चंद्रपूर वीज केंद्रात बदली करण्यात आली आहे. चंद्रपूर वीज केंद्राचे मुख्य अभियंता राजू घुगे यांना चंद्रपूर वीज निर्मिती केंद्राचा दांडगा अनुभव होता. त्यांनी १ जून २०१९ ला चंद्रपूरचे मुख्य अभियंता म्हणून सूत्रे हाती घेतली. या दरम्यान त्यांनी विजेची अधिकाधिक निर्मिती होईल, याकडे विशेष लक्ष दिले. मनमिळाऊ व शांततापूर्वक औद्योगिक समस्येचे निराकरण करण्याची त्यांची शैली होती, मात्र अवघ्या एका वर्षातच त्यांची बदली करण्यात आल्याने राजकिय गेम करण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या जागेवर येणारे भुसावळ वीज निर्मिती केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे हे चंद्रपूरचे मूळ निवासी आहेत.