पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक मुरलीधर (बाबा) शिंगोटे यांचे निधन



मुंबई , दि. 6 (राज्य रिपोर्टर) : दैनिक पुण्यनगरीचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता उर्फ बाबा शिंगोटे यांचे आज दुपारी निधन झाले. त्यांचे जन्मगाव असलेल्या गायमुख वाडी (ता.जुन्नर) येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 82 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी जन्मगावी सामाजिक अंतर राखण्यासंबंधी नेमून दिलेल्या नियमांचे पालन करुन अंत्यसंस्कार होणार आहेत .मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे मुरलीधर शिंगोटे हे एकमेव होते. त्यांचे पत्रकारिता क्षेत्रातील योगदान उल्लेखनीय होते. शिंगोटे बाबांना ’महाराज्य न्यूज’ परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली!
शिंगोटे बाबांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालूक्यातील उंब्रज या गावी 7 मार्च 1938 ला झाला होता. इयत्ता चौथी शिक्षण झालेल्या बाबांनी शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. त्या ठिकाणी सुरुवातीला फळे विक्री व्यवसाय केला. त्यानंतर वृत्तपत्र विक्रेते दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाऊंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे बाबा साक्षीदार होते.
1994 मध्ये मुंबई चौफेर नावाचे दैनिक सुरू केले. यानंतर आपला वार्ताहर, यशोभुमी, कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता ही दैनिके सुरु केली. यातल्या दै.पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली. 2001 साली औरंगाबादेत दै. पुण्यनगरी आवृत्ती सुरू करून त्यांनी विदर्भ, मराठवाड्यात यशस्वी पर्दापण केले. मुरलीधर शिंगोटे यांनी केवळ स्वतःचे वृत्तपत्र काढलेच नाही तर नामांकित वृत्तपत्रांसोबत तेवढ्याच ताकदीने स्पर्धा करत देत त्यांचा खप वाढवला. पत्रकारितेचे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या संपादकांपेक्षा केवळ चौथीपर्यंत शिकलेल्या शिंगोटे यांचे मराठी वर्तमानपत्र व्यवसायाला आकार देण्यात मोलाचे योगदान दिले.
वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला’-मुख्यमंत्री ठाकरे यांची श्रद्धांजली
वृत्तपत्र विक्रेता ते वृत्तपत्र समुहाचा सर्वेसर्वा असा प्रेरणादायी प्रवास पुण्यनगरी वृत्त समुहाचे संस्थापक -संपादक मुरलीधर शिंगोटे यांच्या निधनामुळे थांबला आहे. त्यांची मराठी वृत्तपत्र क्षेत्रातील वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रध्दांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री शोक संदेशात म्हणतात, शिंगोटे बाबांकडे कष्टाळू वृत्ती होती. मुंबईत येऊन फळ विक्रेता, वृत्तपत्र विक्रेता अशी कष्टाची काम करतानाही त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र असावे, असा ध्यास घेतला. ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीचेही साक्षीदार होते. त्यांनी सर्वसामान्यांना समजेल आणि आवडेल अशा भाषेत वृत्तपत्र प्रकाशित करणे सुरु केले. त्यातूनच त्यांच्या वृत्तपत्र समुहाचा विस्तार झाला. मराठी सोबतच अन्य भाषांत दैनिक प्रकाशित करणारे ते एकमेव मराठी होते. त्यांची वाटचाल यापुढेही अनेकांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्रसृष्टीतील प्रेरणादायी प्रवास थांबला. ज्येष्ठ संपादक मुरलीधर शिंगोटे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.