बनावट फेसबुक आय डी बनवून खा. अशोक नेते यांच्या नावावर पैसे ऊकळण्याचा गोरखधंदागडचिरोली – चिमूर चे खासदार अशोक नेते यांच्या नावाने बनावट फेसबुक आय डी बनवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचे काम अज्ञात व्यक्तीकडून सुरू आहे. या संदर्भात खा. नेते यांनी गडचिरोली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असुन पोलीसांच्या आय टी सेलकडून तपास सुरू करण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
खा. अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून या संदर्भात माध्यमांना सदर अवैध कामाबाबत माहिती ऊपलब्ध करून देण्यात आली असुन कोणीही खासदार अशोक नेते यांच्या नावाने व्यवहार करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
अशा प्रकारची फेक फेसबुक आय डी बनवणारी व्यक्ति कोण याचा पोलीसांनी जरी शोध घेणे सुरू केले असले तरी, या व्यक्ति बाबत राजकिय परिघात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. गडचिरोली जिल्हा भाजपात सरळ सरळ दोन मोठे गट पडले आहेत. विरोध हा जरी खुला नसला तरी दोन्ही गट एकमेकांविरोधात कुरापती करण्यात कुठेही मागे नाहीत. या पार्श्वभूमिवर खासदारांची बदनामी करण्याचे हे षडयंत्र तर नाही अशी शंका घेतली जात आहे. मात्र याच वेळी सदर व्यक्ति ही कदाचित् खासदारांच्याच अंतःस्थ गोटातील तर नाही ना अशीही शक्यता नाकारता येत नाही. बनावट फेसबुक आय डी तयार करणे हे फार सोपे काम आहे. कुणाच्याही मोबाइल नंबरवरून कुणाचीही फेसबुक आय डी तयार केली जाऊन ती हाताळली जाऊ शकते. आय टी सेलसाठी सुद्धा हा तपास फार मोठा विषय नसुन काही तासातच ते अशी फेक आय डी कोणत्या मोबाइल नंबर वरून तयार करण्यात आली याचा शोध घेऊ शकतात असे आयटी क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे.
“Ashok Nete MP या नावाने नवीन बनावट फेसबुक अकाउंट बनविण्यात आलेला असून माझ्या नावाने नागरिकांकडून पैसे मागीतल्याच्या तक्रारी मला प्राप्त झालेल्या आहेत. तरी नागरिकांनी जागृत राहून माझ्या नावाने कोणताही पैशाचा व्यवहार करू नये. माझ्या नावाचा गैरवापर करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्ती कडून सुरू आहे त्याचे विरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिलेली असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.तरी नागरिकांनी सावध राहून अशा भूलथापांना बळी पडू नये”.
खासदार अशोक नेते