सर्व प्रार्थना मंदीरे सुरू करावे या मागणीसाठी २९आॅगष्टला भाजपाचे घंटानाद आंदोलनराज्‍य शासनाने सर्वधर्मीयांची देवालये अर्थात मंदीर, मस्‍जीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे त्‍वरीत उघडावी या मागणीसाठी चंद्रपूर जिल्‍हयात भाजपातर्फे दिनांक 29 ऑगस्‍ट रोजी सकाळी 11.00 वा. ‘घंटानाद’ आंदोलन करण्‍यात येणार आहे. ‘दार उघड उध्‍दवा, दार उघड’ अशी हाक या आंदोलनाच्‍या माध्‍यमातुन मुख्‍यमंत्र्यांना देण्‍यात येणार आहे.
गेले सहा महिने संपूर्ण जग, देश, महाराष्‍ट्र कोविड-19 च्‍या महामारीचा सामना करीत आहे. लॉकडाऊननंतर राज्‍यात टप्‍प्‍या टप्‍प्‍याने अनलॉक करण्‍यास जेव्‍हा सुरूवात केली तेव्‍हा राज्‍यातील जनतेने राज्‍य शासनाने केलेल्‍या आवाहनाला सकारात्‍मक प्रतिसाद दिला आहे. राज्‍य शासनाने व्‍यसनाधीन असणा-या नागरिकांची सोय व्‍हावी यादृष्‍टीने मदीरालये सुरू केली. मात्र दुसरीकडे आपले आराध्‍य, श्रध्‍दस्‍थानांसमोर भक्‍तीने लीन होण्‍यासाठी मंदीर, मस्‍जीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळे मात्र नागरिकांसाठी सुरू केली नाही. संतांची भूमी असलेल्‍या महाराष्‍ट्रात मॉल्‍स, मास, मदीरा चालू झाले मात्र सर्वधर्मीयांची देवलाये बंद आहेत. कुंभकरणापेक्षाही गाढ निर्देत असलेल्‍या ठाकरे सरकारला जागे करण्‍यासाठी घंटानाद करण्‍याची आवश्‍यकता आहे. इतर राज्‍यांमध्‍ये देवालये, प्रार्थनास्‍थळे सुरू करण्‍यात आली आहेत. मात्र हा निणर्य महाराष्‍ट्रात अंमलात आला नाही. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सावधानी बाळगण्‍याच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक फलक मंदीर, मस्‍जीद, चर्च, गुरूद्वारा, बुध्‍दविहार, जैन मंदीर आदी प्रार्थनास्‍थळांसमोर लावण्‍यात यावे व सोशल डिस्‍टन्‍सींग पाळत ती सुरू करण्‍यात यावी, अशी मागणी भाजपातर्फे करण्‍यात आली आहे.
भाजपातर्फे हे आंदोलन चंद्रपूर जिल्‍हयात करण्‍यात येणार असून या आंदोलनात सोशल डिस्‍टन्‍सींग पाळण्‍यात येणार आहे. या आंदोलनात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृह राज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. किर्तीकुमार भांगडीया, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले आदी नेते सहभागी होतील. या आंदोलनानंतर मागणी संदर्भात निवेदने, संबंधित तहसिलदार, जिल्‍हाधिकारी यांना सादर करण्‍यात येणार आहे. या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते व जनतेने सहभागी होत घंटानाद करून राज्‍य शासनाला जागे करावे असे आवाहन भाजपाचे (ग्रामीण) जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा महानगर अध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, हरीश शर्मा, संजय गजपूरे, ब्रिजभूषण पाझारे, रामपाल सिंह, महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे आदींनी केले आहे.