चंद्रपूर :- राज्यात पीक विमा भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट करण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य व केंद्र सरकार यांच्याकडे केली आहे.
राज्यात पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै 2020 होती. मात्र कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी 31 जुलै पर्यंत पीक विमा भरू शकले नाही. सध्या शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकरी प्रचंड व्यस्त आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात इंटरनेट ची समस्या आहे, सर्व्हर सतत डाऊन राहत असल्यामुळे शेतक-यांना शेतीची कामे सोडून पीक विमा भरण्यासाठी जावे लागते व परत यावे लागते. यात त्यांच्या शेतीच्या कामांचा प्रचंड खोळंबा होत आहे. त्यामुळे पीक विमा भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट 2020 करणे अत्यंत गरजेचे आहे असे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे. यासंदर्भात केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनाही आ. मुनगंटीवार यांनी पत्र पाठविले आहे.