मेंढपाळांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री ना. वडेट्टीवार यांना निवेदन !



चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यात धनगर समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मेंढपाळीचा आहे. मेंढ्याचे पालनपोषण करून आपला व आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह धनगर समाज बांधव करीत असतात. उन्हाळा-हिवाळ्यात गावाशेजारी एखादया शेतात मेंढ्या चारल्या जातात. मात्र सगळयात जास्त त्रास पावसाळयात मेंढपाळ बांधवांना सहन करावा लागतो. पावसाळयात पावसाचा मार तर कधी वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा अवास्तव त्रासाचा सामना करावा लागतो. अलीकडे वनविभागांकडून त्रास देण्याचे प्रमाण फार वाढले आहे. यासंबंधात वरिष्ठ अधिकाऱ्यांना, संबंधित विभागाला अनेक तक्रारी, निवेदने देण्यात आली असताना सुध्दा वनविभागाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. विजय वडेट्टीवार यांना पंचायत समिती सभापती विजय कोरेवार, धनगर समाज संघर्ष समिती नागपूर विभाग अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार, सामाजिक कार्यकर्ते मारोती कंकलवार यांनी नुकतेच यासंदर्भात एक निवेदन दिले. यावेळी मंत्री महोदयांनी मुख्य वनसंरक्षक रामराव यांच्याशी संपर्क साधून मेंढपाळ बांधवाना त्रास देऊ नये अशा सूचना दिल्या. त्यावर मुख्य वनसंरक्षक रामाराव यांनी मेंढपांळ बांधवांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊ असे आश्वासन देत शेळ्या-मेंढ्या चराई संबंधात कायमस्वरूपी परवाना मिळण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.