लग्नात बेकायदेशीर जमलेल्या जमावाकडुन वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारास मारहाण = बोर्डा येथील घटना

 
वरोरा प्रतिनिधी :   बोर्डा येथील एका कुटुंबाकडे सोमवारी विनापरवाना सुरू असलेल्या लग्न समारंभातील बेकायदेशीर जमावाचे फोटो काढून वृत्त संकलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका दूरचित्रवाहिनी प्रतिनिधीला जमावाने मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. हितेश राजनहिरे असे या प्रतिनिधीचे नाव आहे.              वरोरा शहरालगतच्या बोर्डा गावात 29 जुन रोजी हितेश राजनहिरे यांचे घरासमोर लग्नसमारंभाकरिता गर्दी जमलेली होती. त्यावेळी थोरात फेब्रिकेशन मधल्या एक मुलगा सदर चॅनेल प्रतिनिधीचे घरी गेला आणि कोरोनाची लागण सुरू असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्रीत गर्दी कशी, कोणाचेही तोंडावर मास्क नाही, सोशल डिस्टनसिंगचे पालन नाही. अशी माहिती दिली. यानंतर सदर प्रतिनिधीने कार्यक्रमाची परवानगी आहे किंवा नाही याची शहानिशा करण्यासाठी आपल्या भ्रमणध्वनीवरून ग्रामपंचायत बोर्डा सचिव मोरेश्वर कोमटी यांचेशी संपर्क साधला. ग्रामसेवक लगेच घटनास्थळी पोहोचले. चॅनेल प्रतिनिधी व ग्रामसेवक यांच्यात सदर कार्यक्रमाची परवानगी घेतली नाही याविषयी संवाद सुरू असताना आरोपी रमेश मिटपल्लीवार , विजय मिटपल्लीवार व त्यांच्या मुलगा या तिघांनी चॅनेल प्रतिनिधीच्या पाठीमागून येवून शिविगाळ करीत हाताने व बुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. ग्रामसेवकांनी घटनास्थळावरून तत्काळ प्रतिनिधीला आपल्या दुचाकीवर बसवून पोलीस स्टेशनमध्ये नेले. यामुळे पुढील अनर्थ टळला. सदर घटनेच्या पोलीसात तक्रारीवरून तिन्ही आरोपींवर साथीचे रोग अधिनियम कलम 269 , भारतीय दंड संहिता नुसार अश्लील शिवीगाळ करणे, कलम 294 , जीवे मारण्याची धमकी देणे कलम 506 तसेच कलम 270, 271, 323  नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर शहरातील वृत्तपत्र प्रतिनिधी पोलीस स्टेशनमध्ये जमले होते. पत्रकारांना संरक्षण मिळावे आणि आरोपींवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा चंद्रपूर ,व पुरोगामी पत्रकार संघ यांनी  उपविभागीय पोलीस अधिकारी, वरोरा यांना निवेदन देवुन केलेली आहे. घडलेल्या घटनेचा पत्रकार संघाकडून हल्लेखोरांचा तीव्र निषेध करण्यात आला आहे.