ग्रामीण भागातील कोरोना तपासणी यंत्रणा आणखी व्यापक व नेटकी करण्यात यावी :- गृहमंत्री अनिल देशमुखचंद्रपूर, दि. 6 जून : चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांबाबत समाधान व्यक्त करतांना राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ग्रामीण भागांमध्ये व्यापक व नेटकी तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. ग्राम समिती बळकट करणे, संस्थात्मक अलगीकरण करणे, तपासणीमध्ये पल्स ऑक्सीमीटरचा वापर करणे आवश्यक असल्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवनमध्ये कोरोना संदर्भातील आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. आगामी काळात अन्य मोठ्या शहरांमधून आणखी नागरिक चंद्रपूर शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पोहोचणार आहे. त्यामुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या मार्फत कोरोना प्रादुर्भाव होणार नाही. यासाठी तपासणी मोहीम आणखी काटेकोर व जबाबदारपणे राबवा, असे निर्देश त्यांनी आज येथे दिले.

या बैठकीला खासदार सुरेश उपाख्य बाळू धानोरकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार,आ. सुधीर मुनगंटीवार, आ. किशोर जोरगेवार,आ. सुभाष धोटे,आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, आयुक्त राजेश मोहिते यांच्यासह सर्व प्रमुख विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याहस्ते आत्मभान अभियान अंतर्गत जनजागृती विषयक बॅनर,पोस्टर व चित्रफितीचे अनावरण यावेळी करण्यात आले.या बैठकीत लोकप्रतिनिधीनी सूचना मांडल्या. खासदार बाळू धानोरकर यांनी आरोग्य तपासणी अधिक व्यापक, पल्स ऑक्सिमिटरचा वापर व्हावा, लग्नसमारंभात काही प्रमाणात शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी केली. माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लॉनमध्ये लग्न समारंभाला परवानगी देण्याबाबत आग्रह केला. पोलिसांच्या घराच्या डागडुजीसाठी खर्च करणाऱ्या कुटुंबाचा घरभाडे भत्ता कापू नये, अशी सूचना केली. याशिवाय कापूस खरेदीला निश्चित कालावधीत पूर्ण करण्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच जिल्हयातील पूर परिस्थिती, आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याची सूचना केली.

कापूस खरेदीबाबत आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार यांनी देखील गतिशील व मर्यादित कालावधीमध्ये कापूस खरेदी पूर्ण करण्यात यावी अशी मागणी लावून धरली. जिल्ह्यातील कापूस खरेदीच्या बिकट प्रश्नाबाबत यांनी वस्तुस्थिती मांडली. याशिवाय चना व तूर खरेदीचा प्रश्नदेखील जोरगेवार यांनी मांडला.

आमदार धोटे यांनी कंटेनमेंट झोन मधील मजुरांना ऐन हंगामात अडकून पडावे लागणार नाही अशा पद्धतीचे नियोजन प्रशासनाने करावे, असे आवाहन केले. गृह विभागाच्या काही मागण्या देखील यावेळी मांडण्यात आल्या. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी देखील जिल्ह्यातील पोलिसांच्या समस्यांची यावेळी मांडणी केली. त्याचप्रमाणे कंटेनमेंट झोनमध्ये मजुर, कामगारांसाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना केली.

गृहमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना संबोधताना लॉकडाऊन संपुष्टात येत असताना स्थानिक स्तरावर काही निर्णय घ्यावयाचे असल्यास राज्य शासनाच्या परवानगीने व विश्वासात घेऊन बदल करा.ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात तपासणी वाढविण्यात यावी. पल्स ऑक्सीमीटरचा वापर करण्यात यावा.सोबतच त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेची जनसामान्यांपर्यंत माहिती पोहोचण्याचे निर्देश सर्व यंत्रणेला दिले. या योजनेमध्ये सर्व नागरिकांना कोरोना सह सर्व आजाराला आर्थिक सहाय्य मिळणार असून त्याचा लाभ सामान्यातील सामान्य नागरिकांना व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे स्पष्ट केले.

50 लोकांच्या उपस्थितीत होणाऱ्या विवाह संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींच्या प्रस्तावाची योग्य दखल घेण्यात येईल. शाळा कॉलेज सुरू करण्याबाबतची पूर्वतयारी सुरू करण्यात यावी, 20 जून पूर्वी कापूस खरेदी पूर्ण करण्यात यावी.बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी करून त्यांना संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. ग्रामस्तरीय समिति आणखी बळकट करावी.जिल्ह्यातील महिला बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांनी तयार केलेले मास्क लोकांपर्यंत पोहोचता येईल यासाठी प्रयत्न करावे. असे निर्देश त्यांनी दिले.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सद्यस्थिती व उपाययोजना या संदर्भात सादरीकरण केले.जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था व कोरोनाच्या काळामध्ये पोलीस विभागाने केलेली उपाययोजना याविषयीचे सादरीकरण पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी केले. तर कोविड-19 संदर्भात जिल्ह्यातील जनजागृती कार्यक्रम विषयी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी सादरीकरण केले.महानगरपालिका अंतर्गत शहरांमध्ये कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाययोजना विषयीचे सादरीकरण आयुक्त राजेश मोहिते यांनी केले.सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी संपत खलाटे यांनी केले.
00000