पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या मागणीला उपमुख्यमंत्री अजीत पवारांचा प्रतिसाद


चिमूर व परिसरासाठी आता

वडसा येथे रेल्वेने खताचा पुरवठा नियमित होणारचंद्रपूर, दि. 21 मे : विदर्भात युरिया खताचा अतिरिक्त साठा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात उपलब्ध असावा. तसेच चिमूर व लगतच्या परिसरासाठी चंद्रपूर ऐवजी वडसा या ठिकाणावरून रेल्वेने खतांची उपलब्धता व्हावी, अशी मागणी राज्याचे मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. आजच्या खरीप पूर्व बैठकीत ही मागणी मान्य करण्यात आली.

राज्याची महत्त्वपूर्ण अशी खरीप हंगामपूर्व बैठक आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयातून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सहभागी झालेले विजय वडेट्टीवार यांनी खताचा सुलभ व मुबलक पुरवठा होण्यासाठी वळसा या ठिकाणावरून चिमूर व अन्य भागासाठी खताची उपलब्धता व्हावी, ही मागणी मान्य करून घेतली.

त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना लगेच खतांची उपलब्धता होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच यावेळी त्यांनी जिल्ह्यामधील कापूस उत्पादकांना सीसीसीआयच्या (भारतीय कापूस महामंडळ) मार्फत होत असलेल्या खरेदीमध्ये जात असलेल्या अडचणी बाबतची माहिती दिली. खाजगी खरेदी बंद करण्यात यावी. ग्रेडरची संख्या वाढवावी, पावसाळ्यापूर्वी कापूस खरेदी पूर्ण व्हावी, फक्त शेतकऱ्यांच्याच कापसाला योग्य भाव मिळावा, तसेच कापूस खरेदी करण्यासाठी गाड्यांच्या संख्येची मर्यादा घालने चुकीचे असल्याचे लक्षात आणून दिले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दोन्ही मागण्यांसंदर्भात सकारात्मकता दर्शवत चिमूर परिसरासाठी वळसा येथून खतपुरवठा व सीसीआयचा खरेदीमध्ये गाड्यांची मर्यादा यापुढे ठेवली जाणार नाही असे स्पष्ट केले.

तेलंगाना राज्यांमधून मोठ्या प्रमाणात बोगस बीटी बियाणे महाराष्ट्रात येत असल्याचे सत्य यावेळी वडेट्टीवार यांनी लक्षात आणून दिले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या समारोपीय भाषणात याचा उल्लेख करून कोरोना प्रादुर्भाव काळामध्ये अशाप्रकारच्या बोगस बियाण्यांचे येणारे पीक परवडणारे नाही. यासाठी आवश्यक त्या व्यासपीठावर बोलणी केली जाईल, असे स्पष्ट केले.

हळद पीक जीवनावश्यक वस्तू आहे. या पिकाखालील क्षेत्र चंद्रपूर जिल्ह्यात वाढत आहे. चिमूर,भद्रावती इत्यादी हळद पिकात कुरकुमीन हा जो घटक आहे. त्या आधारे या पिकाला खरेदीचा हमीभाव ठरावा अशी, पालकमंत्री यांनी बैठकीत मागणी केली.

जिल्ह्यामध्ये 2 हजाराच्या वर वीजजोडणी प्रलंबित असल्याचे यावेळी त्यांनी या बैठकीत लक्षात आणून दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित जोडण्या मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याबाबत नियोजन करण्यात येईल,असे आश्वासन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

याशिवाय जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या अन्य प्रमुख प्रश्नांबाबतही त्यांनी यावेळी मुद्दे उपस्थित केले. या बैठकीला जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्वर खाडे आदी उपस्थित होते.