शहरातील नाले सफाई, निर्जंतुकीकरण व पाणी टंचाई याकडे प्रत्‍येक नगरसे‍वकाने विशेष लक्ष द्यावे – आ. सुधीर मुनगंटीवार

झूम मिटींगद्वारे आ. मुनगंटीवार यांनी साधला नगरसेवकांशी संवाद

जून महिन्‍यात सुरू होणारा पावसाळा लक्षात घेता शहरातील नाले सफाईचे काम तातडीने पूर्ण करण्‍यात यावे तसेच सध्‍या तापणारा उन्‍हाळा लक्षात घेता पाणी टंचाई निवारणाच्‍या दृष्‍टीने कार्यवाही करावी, अशा सूचना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी महापौर सौ. राखी कंचर्लावार यांना दिल्‍या. येत्‍या 30 मे पर्यंत नाले सफाईचे काम पूर्ण करण्‍यात येईल तसेच पाणी टंचाई निवारणाच्‍या दृष्‍टीने महानगरपालिकेतर्फे कार्यवाही प्रगतीपथावर असल्‍याची माहिती महापौर राखी कंचर्लावार यांनी दिली.
आज दिनांक 16 मे रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपाच्‍या चंद्रपूर महानगरपालिका सदस्‍यांसह झूम मिटींग द्वारे संवाद साधला. यावेळी प्रत्‍येक मनपा सदस्‍याने आपल्‍या प्रभागातील स्‍वच्‍छता, निर्जंतुकीकरण, नाले सफाई याकडे विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना दिल्‍या. प्रभागातील प्रत्‍येक नागरिकाची नोंदणी आरोग्‍य सेतु अॅपवर होईल याबाबत विशेष लक्ष द्यावे, असेही त्‍यांनी यावेळी सूचविले. कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावाच्‍या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनच्‍या परिस्‍थीतीत भारतीय जनता पार्टीतर्फे आपण गरीब व गरजूंना सर्वतोपरी सहकार्य केले. आता सुध्‍दा काही गरजू व गरीबांना मदतीची आवश्‍यकता असल्‍यास ती सुध्‍दा करण्‍याच्‍या दृष्‍टीने लक्ष देण्‍याच्‍या सूचना त्‍यांनी यावेळी दिल्‍या. 18 मे नंतर लॉकडाऊन शिथील झाल्‍यावर काही सेवाभावी उपक्रम राबविण्‍याचे सुतोवाच सुध्‍दा त्‍यांनी या संवादादरम्‍यान दिले.
यावेळी काही नगरसेवकांनी त्‍यांच्‍या प्रभागाशी संबंधित समस्‍या सांगीतल्‍या. या झूम कॉन्‍फरन्‍समध्‍ये महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, अनिल फुलझेले, संजय कंचर्लावार, सौ. अंजली घोटेकर, संदीप आवारी, रवि आसवानी, सुभाष कासनगोट्टूवार, वसंता देशमुख, सोपान वायकर, राहूल घोटेकर, कल्‍पना बगुलकर, छबूताई वैरागडे, संगीता खांडेकर, देवानंद वाढई, सौ. आशा आबोजवार, सौ. माया उईके, सौ. शिला चव्‍हाण, सौ. शितल गुरनुले, सौ. निलम आक्‍केवार, स्‍वामी कनकम, सौ. ज्‍योती गेडाम, सौ. खुशबु चौधरी, सौ. अनुराधाताई हजारे, सतिश घोनमोडे, प्रशांत चौधरी, कु. शितल कुळमेथे, राजेंद्र अडपेवार, सौ. शितल आत्राम, सौ. पुष्‍पा उराडे, अंकुश सावसाकडे, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. जयश्री जुमडे, सौ. वनिता डुकरे, सौ. वंदना जांभुळकर, सौ. सविता कांबळे, सौ. वंदना तिखे आदी उपस्थित होते.