कंत्राट रद्द,किमान वेतनानुसार थेट कामगारांच्या खात्यात तिन महिन्यांचे पगार जमा झाले,जन विकास कामगार संघाचा विजय

जन विकास कामगार संघाच्या आंदोलनाचा मोठा विजयजन विकास कामगार संघाचे अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात 2019 पासून किमान वेतनाच्या मागणीकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील पाचशेच्या जवळपास कंत्राटी कामगार संघर्ष करीत आहेत. मार्च 2019 मध्ये कामगारांनी केलेल्या बेमुदत उपोषणाला नंतर शासनाने किमान वेतन लागू केले होते. यापूर्वी कामगारांना महिन्याला 6000रुपये पगार मिळत होता.किमान वेतन लागू झाल्यानंतर कामगारांना चार ते पाच हजार रुपयांची वेतन वाढ होणे अपेक्षित होते.परंतु निविदा प्रक्रियेत घोळ झाल्यामुळे कामगार किमान वेतनापासून वंचित राहिले. किमान वेतनासाठी जानेवारी 2020 पासून जन विकास कामगार संघाने पुन्हा आंदोलन सुरू केले.52 दिवस चाललेल्या या आंदोलनाची दखल घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी चुकीचे कंत्राट रद्द केले. पगार थेट कामगारांच्या खात्यामध्ये जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला दिले. मात्र निधीअभावी मागील अनेक महिन्याचा पगार थकीत होता. जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी कामगारांच्या समस्येची दखल घेतली व खनिज विकास निधीतून कामगारांना पगार देण्याची तरतूद केली.अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कामगारांच्या खात्यामध्ये थेट पगार जमा झाले. कामगारांना वेतनवाढ मिळाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता नव्याने निविदा प्रक्रिया राबविल्यानंतर कामगारांना पुन्हा एक ते दोन हजार रुपये वेतन वाढ मिळणार असल्याची प्रतिक्रिया जन विकासचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिली.तसेच दोन वर्षाच्या संघर्षा मध्ये अनेक अडचणीवर मात करून कामगारांनी हक्काचे किमान वेतन मिळवले,हा कामगार एकतेचा विजय असल्याचे सुद्धा त्यांनी नमूद केले.

जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या संपूर्ण प्रकरणांमध्ये मोलाचे सहकार्य केले. तसेच स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी सुद्धा वेळोवेळी सहकार्य केले.राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक दीपक जयस्वाल यांनी या समस्येचे गांभीर्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेपर्यंत पोहचविण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला.विदर्भ राज्य पक्षाचे अॅड. श्रीहरी अणे व नागपूर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता अॅड. नीरज खांदेवाले,चंद्रपूरचे अॅड.नंदकिशोर नौकरकर,अॅड.सोमानी,चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व माध्यम प्रतिनिधी यांनीसुद्धा या संघर्षामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली.जन विकास सेने तर्फे सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.