▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

आमचे भरले घरदार, त्यांचा बंद रोजगार आहे......! फोटोसाठी मदतीला ऊत, दु:खास ना पारावार आहे.....! जो तो पाही आपलाच स्वार्थ अश्रु कोण पुसणार आहे......!


लाॅकडाउन
आहोत घरी महिनाभर,
पगार ना थांबणार आहे.....‌‌!
झोपडीत गरीबांच्या मात्र,
काळाकुट्ट तो अंधार आहे.....!
आम्हां काय हो रोज दिवाळी,
दिवा त्यांचा विझणार आहे......!
रोज चिल्ली पिल्ली बापाची का,
कशी कशी वाट बघणार आहे.....!
आमचे भरले घरदार,
त्यांचा बंद रोजगार आहे......!
फोटोसाठी मदतीला ऊत,
दु:खास ना पारावार आहे.....!
जो तो पाही आपलाच स्वार्थ
अश्रु कोण पुसणार आहे......!
.......आर जे सुरवाडे

यांची लॉक डाऊन व आजच्या कोरोना विषाणू फैलाव मुळे गोरगरीब जनतेचे काय हाल झाले आहे. ते विषद करणारी कविता.....!
+++++++++++++++++
ग्रीन झोन असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात काल शनिवार दि. 2 मे रोजी कोरोना बाधित रुग्ण मिळाला आणि प्रशासन व नागरिकांमध्ये खळबळ उडाली. मागील 40 दिवसांपासून घरामध्ये असणारे चंद्रपूरकर आत्ता सुटकेच्या श्वास घेत असतांनाच झालेल्या या आघाताने मात्र पुन्हा एकदा संकटाच्या खाईत गेल्याचा भास त्यांना होत आहे. घाबरू नका, प्रशासन-शासन तुमच्यासोबत आहे असे म्हणून धीर मिळत आहे, पण....

आहोत घरी महिनाभर,
पगार ना थांबणार आहे.....‌‌!
झोपडीत गरीबांच्या मात्र,
काळाकुट्ट तो अंधार आहे.....!
 या कवि आर. जे. सुरवाडे यांच्या कवितेतील वास्तव दर्शन करणारे सत्य जनसामान्यांच्या वाट्याला आले आहे. जिल्ह्यात एकही रुग्ण नाही, आम्हाला शिथीलता मिळणार, थोडा-बहुत रोजगारही उपलब्ध होणार अशी आस लावून बसणाऱ्या चंद्रपूरवासियांना बाधित रुग्णाच्या वृत्ताने मात्र हेलावून सोडले आहे. "मदत करणारे हात ही" आता थंडावलेले आहेत, गरिबांचा वाली नाही अशी स्थिती आज दिसत आहे. ज्यावेळेस मदतीची खरी गरज होती त्याच वेळेस नेत्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आपला मदतीचा ओघ आटोपता घेतल्याचे चित्र जिल्ह्यात दिसू लागले आहे. ज्या नेत्यांकडून मदतीची अपेक्षा होती त्यांचे मोबाईल आज "नॉट-रिचेबल" झाले आहेत.  गरीबांच्या "अन्नधान्य किट्स" ला राजकिय नेत्यांच्या स्वार्थाचे ग्रहण लागल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळाले आहे. अन्नधान्य, राशन या साऱ्या वस्तू जीवनावश्यक आहेत परंतु त्यासोबतच लागणारे खर्च याच्या जोडतंत्रातून बाहेर निघण्याची वेळ आल्यानंतरच पुन्हा एकदा नियतीने आपला डाव रचला व जिल्ह्यातील साऱ्यांवरचं दडपण आणले. मदतीचा ओघ, स्थिरावला नाही, मंदावला आहे पण हे पुरेसे आहे काय? याचाही आता विचार व्हायला हवा. आता पुढे काय ? अशी विचारणा जो-तो एकमेकांना करू लागला आहे. संकट आले आहे, ते आणखी गडद होतील याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपाययोजना, पर्याय शोधल्या जातील, परंतु मानसिक स्थित्यंतराचे काय? एकमेकांना दिलासा देण्याशिवाय दुसरा काही पर्याय आज तरी समोर दिसत नाही आहे. स्वत:ला सुदृढ व निरोगी ठेवून, मित्रांना, आप्तेष्टांना धिर देवून आलेल्या प्रसंगाला सामोरे जायचे आहे, लढायचे आहे व संकटाला हरवायचे. "एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ" या म्हणीप्रमाणे येणाऱ्या काही दिवसात प्रवास करायचा आहे. संकट येईल, ते गडद ही होईल व निर्धाराने संपुष्टात येईल. या लढू आणि जिंकू या निर्धाराने कामाला लागू या!!!