कर्तव्य बजावतांना आरोग्याची काळजी घ्या – सौ. संध्या गुरनुले


कोरोना युद्धात पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आपला जीव धोक्यात घालून पोलीस जनसेवेत तैनात आहेत. न दिसणा-या कोविड १९ या शत्रूशी हा लढा आहे. नागरिकांचे आरोग्य राखताना व कर्तव्य बजावताना पोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन जि. प. अध्यक्ष सौ. संध्या गुरनुले यांनी केले. त्या भारतीय जनता पार्टी जिल्हा चंद्रपुर तर्फे मूल पोलीस स्टेशन येथे आयोजित आरोग्य तपासणी व आरोग्य सुरक्षा किट वितरण उपक्रमात आज गुरुवार (१४ मे) ला अध्यक्ष म्हणून बोलत होत्या.
यावेळी मुल नगर परिषदेचे उपाध्यक्ष नंदू रणदिवे, सभापती प्रशांत समर्थ, नगरसेवक अजय गोगुलवार, अनिल साखरकर, मिलिंद खोब्रागडे, प्रशांत बोभाटे, रुपेश ठाकरे, पो.नि. सतिशसिंह राजपूत, आय.एम.ए. चे डॉ. मंगेश गुलवाडे, डॉ सुमेध खोब्रागडे, डॉ बादल चांदेकर, डॉ नेहा वैद्य, प्रकाश धारणे, प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
यावेळी बोलताना सौ. संध्या गुरुनुले म्हणाल्या, "जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा" हा मंत्र स्वीकारून भाजपा काम करते. संकट कसे ही असो लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार नेहमी सहकार्याच्या भूमिकेत असतात. कोरोनाच्या संकटात शासनाने प्रेरणा घ्यावी असे कार्य त्यांचे आज सुरू आहे, याची जाणीव जनतेला आहे. या युद्धात पोलिसांची भूमिका लक्षात घेऊन त्यांची आरोग्य तपासणी होत आहे. आरोग्य सुदृढ रहावे म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांचेकडून आरोग्य सुरक्षा किट देण्यात येत असल्याचे त्यांनी जाहीर केले. जनतेला सर्वतोपरी सहकार्य केल्यावर अश्या उपक्रमांतून आ.सुधीर मुनगंटीवार प्रशासनालाही सुदृढ करीत आहेत, असे त्या म्हणाल्या.
प्रारंभी डॉ गुलवाडे यांनी आरोग्य तपासणीची आवश्यकता विशद करीत, आत्मविश्वास उंचावण्यासाठी सुदृढ आरोग्य गरजेचे असल्‍याचे सांगितले. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची तपासणी करण्यात येऊन त्यांना आरोग्य सुरक्षा किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सूरज पेदुलवार, प्रज्वलंत कडू यांनी पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची नोंदणी केली.
आरोग्य तपासणीसाठी आरोग्य कर्मचारी (एएनएम) मयुरी धर्मपुरीवार, प्रज्ञा मेश्राम, प्रशांत महाबनकर यांनी सहकार्य देत सर्वांचे बी.पी., शुगर, ताप व अक्सिजन चे प्रमाण तपासले. गरजुंना निःशुल्क औषध देण्यात आले. तर, यशस्वीतेसाठी उज्वल धामनगे, रामकुमार आकापेल्‍लीवार यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. पोलीस अधिकारी प्रशांत ठवरे, मनोज गदादे, वनमाला पारधी, पुरुषोत्तम राठोड यांनी सहकार्य केले.