आत्ताचं हाती आलेले दिलासादायक वृत्त...!
जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबियातील सगळे, मुलगा, मुलगी व पत्नी तिघेही निगेटिव्ह आहेत. तर पॉझिटिव्ह रुग्ण ज्याठिकाणी रात्रपाळी मध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत होता. त्या अर्पाटमेंटच्या सर्व 30 नागरिकांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले आहेत. नागपूर कोरोना प्रयोग शाळेत तपासणीसाठी गेलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 49 स्वॅब पैकी 37 स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. अन्य 12 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.
मंगळवार दि. ५ मे, हा दिवस जिल्हावासियांसाठी दिलासादायक राहिला. मागील ४ दिवसांपासून चंद्रपूरवासी "तणावात" होते, त्या तणावातून थोडीशी मुक्ती देऊन हा दिवस मावळला. शनिवार २ में रोजी अंधार होता-होता मागील ४० दिवसांपासून "कोरोना"मुक्त असलेल्या चंद्रपूरात एक "पाॅझिटिव्ह" रूग्ण आढळलेल्या वृत्ताने दिवस अंधाराच्या कवेत सामावला. एकाएकी विश्वास न बसणाऱ्या या वृत्ताची पूर्वी पूर्ण शहानिशा करूनचं "त्या" वृत्ताला अत्यंत जड अंत:करणानेचं साऱ्यांनी आपापल्या माध्यमांतून प्रसिद्धी दिली. "त्या" प्रसिद्धीनंतर ही वृत्तात काही "मिस अन्डरस्टॅडींग" तर नाही नां? याची खातरजमा बहुतेकांनी आपल्या विश्वासू माध्यम प्रतिनिधींकडून करून घेतलीच. हे चार दिवस चंद्रपूरवासियांसाठी तोला-मोलाचे गेले. या जिल्ह्यात एवढे रूग्ण वाढले, त्या जिल्ह्यात तेवढ्या पटीने रूग्णसंख्येत वाढ झाली, याच भितीयुक्त चर्चेत संचारबंदी चे मागील ४० दिवस जिल्हावासीयांचे गेले होते. यातून आमचा जिल्हा वगळला गेला आहे, येणाऱ्या दोन दिवसांत शिथीलतेसोबत थोड्याबहू प्रमाणात कां असेना या ४० दिवसांच्या वनवासातून "मुक्ती" मिळेल, या सुखावह स्वप्नरंगात न्हाऊन निघण्याच्या ऐन भरात "स्वप्नभंग" झाले. शहरातील कृष्णनगर परिसरात कोरोना बाधित रूग्ण मिळाला होता. शहरातील बंगाली कॅम्प परिसरातील १० हजारांच्या जवळपास असलेल्या कृष्णनगर या भरगच्च वस्तीसोबत बंगाली कॅम्प व शहरातील काही प्रमुख भाग सतर्कता म्हणून सिल करण्यात आला. रूग्ण, त्यांचे कौटूंबिक सदस्य, नातेवाईक, संपर्कात आलेली मित्रमंडळी, शेजारी यांच्या रक्ताचे नमूने तपासासाठी घेण्यात आले, यातील काहींना घरातचं तर काहींना वेगवेगळ्या ठिकाणी "काॅरनटाईन" करण्यात आले. आत्ता काय होणार, "कोरोना" रूपी हा राक्षस किती जणांना विळखा घालणार, यात जिल्ह्यातील जो-तो चिंतातूर दिसत होता. अख्ख्या जगाला या "चिनी व्हायरस" ने आपल्या कवेत घेतले आहे. आर्थिक महासत्ता असलेल्या बलाढ्यशाली देशाची आर्थिक व्यवस्था खिळखिळी करणाऱ्या, वैद्यकीय क्षेत्रात अव्वल म्हणविणाऱ्या अतिसमृद्ध प्रगतशील देशातील नागरिकांचे हजारोंच्या संख्येने प्राण घेणाऱ्या या "कोरोना" च्या विषाणूवर भारताने बाकी जगाच्या तुलनेत बऱ्यापैकी आटोक्यात ठेवले असले तरी या "चिन निर्मीत कोरोना" ने देशातील इतर जिल्ह्यात केलेला शिरकाव, मांडलेला थैमान बघून याच विषाणू ने चंद्रपूर जिल्ह्यात अगदी शेवटी-शेवटी केलेले आगमन, हा विचारचं जिल्हावासियांसाठी अंगावर कांटा आणणारा होता. कुणाच्या संपर्कात आला असेल रूग्ण, रूग्णाच्या संपर्कात कोण आले असेल, कूटूंब-शेजारी कूणाच्या संपर्कात आले असेल, आपल्या संपर्कात तर कुणी आले नाही नां? या भयरूपी संशयाने जवळच्या आप्तेष्टांकडे ही मागील काही दिवसांत प्रश्नार्थकरित्या बघण्याच्या प्रवृत्तीने प्रत्येकाच्या मनात "घर" केले होते. "सुतकी वातावरण" जिल्ह्यात बघायला मिळाले. या ४० दिवसांत जिवाचे रान करणारा आरोग्य विभाग, पोलिस विभाग, आपत्ती विभागात दिवस-रात्र राबणारे अधिकारी-कर्मचारी एकाएकी तणावात आले होते. त्यावरचं मंगळवार च्या वृत्ताने हलकासा विराम लावला. रूग्णाचे कुटूंब (पत्नी, मुलगा व मुलगी) व त्यासोबतचं रूग्णाच्या संपर्कात आलेले ४४ पैकी २४ जण "निगेटिव्ह" असल्याचा दिलासादायक अहवाल आला. बाधित रूग्णाचे अन्य आजार बघता वैद्यकीय तपासणीसाठी त्याला नागपूर ला हलविण्यात आले असून रूग्ण ही "निगेटिव्ह" चं निघेल, असा कयास जिल्हावासियांकडून लावला जात आहे आणि तो वास्तवात उतरावा अशी अपेक्षा आज प्रत्येकजण करित आहे. विविध अफवांना पेव फुटला असला तरी रूग्णाच्या कुटूंबातील आलेल्या "निगेटिव्ह" अहवालातून "पाॅझेटिव्ह" काहीतरी घडेल असा आशेचा किरण जिल्हावासियांच्या मनात जागू लागला आहे. त्याचे कारण ही तसेच आहे, रूग्णाचा २४ आप्तेष्टांचा आलेला "निगेटिव्ह" रिपोर्ट, रूग्णाची आत्तापावेतो कोणत्याही प्रवासाची नसलेली हिस्ट्री, सोशल माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर "व्हायरल" झालेल्या रूग्णाच्या रिपोर्टमध्ये तांत्रिक दोषाने "फिमेल" असा उल्लेख झाल्याची घटना "कुछ तो गडबड है दया!" या सीआयडी मधील प्रसंगाची आठवण करूण देणारा आहे. असेच अनकल्पनिय "तांत्रिक" दोषाने काहीतरी घडले असावे, असा लावण्यात येत असलेला चंद्रपूरकरांचा "कयास" सत्यात उतरावा, असे आज साऱ्यांनाच वाटायला लागले आहे. येणाऱ्या एक-दोन दिवसांत सत्य काय? हे समोर येणारचं आहे.
ज्या अपार्टमेंट मध्ये बाधित रूग्ण कार्य करित होता, त्या अपार्टमेंटमधील सर्व 30 नागरिकांचे स्वॅब अहवाल निगेटिव्ह आले. नागपूर कोरोना प्रयोगशाळेत तपासणीसाठी गेलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 49 स्वॅब पैकी 37 स्वॅब नमुने निगेटिव्ह आले आहेत. अन्य 12 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत असल्याचे अधिकृत्त शासकीय वृत्त आत्ताचं म्हणजे दुपारी १२ वाजता प्रसार माध्यमांना देण्यात आले आहे.
आत्ताच्या स्थितीत बाहेर जिल्ह्यातून, राज्यातून आपले बांधव आपापल्या "घरट्यां (होम प्लेस)" मध्ये येत आहेत, त्यांना आज आपूलकीची आवश्यकता आहे, त्यांचा तिरस्कार न करता, माणूसकीचे दर्शन घडवून स्नेहाची वागणुक देत शासकीय निर्देशांचे तंतोतंत पालन करीत सामुहीकरित्या चंद्रपूर जिल्ह्याला "कोरोना" मुक्त करण्याचा-ठेवण्याचा संकल्प करू या !