समाजहितासाठी पोलीस सुरक्षित असणे आवश्यक - प्रकाश धारणेकोरोनाच्या संकटातही भारतीय जनता पार्टी जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. या जनतेला संरक्षण पोलीस देतात. कोरोना महामारीत जीवाची परवा न करता हे योद्धे कार्यरत आहेत. ते सुदृढ असतील तरच हे युद्ध जिंकता येईल. समाजहितासाठी पोलीस व त्यांचा परिवार सुरक्षित असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन भाजपा नेते प्रकाश धारणे यांनी केले.
ते कोठारी येथे आज बुधवार (२० मे) ला भारतीय जनता पार्टच्या वतीने आयोजित सुरक्षा रक्षक किट वितरण उपक्रमात अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर आ. सुधीर मुनगंटीवार यांचे तर्फे सर्वाना आरोग्य सुरक्षा किट देण्यात आली.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बल्लारपूर प.स.समिती सदस्य सोमेश्वर पदमगिरीवार, कृषी उत्‍पन्‍न बाजार समिती सदस्य सुनील फरकड़े, ग्रा.पं. सदस्य स्नेहल टिम्बडिया, सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष अंबिके, डॉ मंगेश गुलवाडे, प्रशांत विघ्नेश्वर, रामकुमार, आकापेलिवार, उज्वल धामनगे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना प्रकाश धारणे म्हणाले, कोरोना संकटाचा सामना बरेच दिवस करावा लागणार आहे. त्यामुळे सुरक्षित व सजग राहणे हाच त्यावर उपाय आहे. सगळ्या नियमांचे पालन केले तर कोरोनाचा शिरकाव घरात होणार नाही. नागरिकांना ही शिस्त फ़क्त पोलीस लावू शकतात, असेही ते म्हणाले.
या प्रसंगी सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष अंबिके यांनी कोरोना संकटातच नाहीतर नेहमीच १००% सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
डॉ मंगेश गुलवाडे यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या ५६ दिवसात कोरोना संकटात केलेल्या मदतकार्याचा उल्लेख करीत आरोग्य किटचे महत्व विशद केले. डॉ गुलवाडे आणि प्रा.आ.केंद्राचे डॉ शरीफ इकबाल शेख यांचे नेतृत्वात आरोग्य कर्मचारी दुर्गावती गेडाम व सतीश सिडाम यांनी आरोग्य तपासणी केली. परि.पो.उपनि. एस बी धोडके यांनी आभार मानले. विशेष म्हणजे सर्वांवर पुष्पांचा वर्षाव करून कोठारी पोलिसांनी निरोप दिला.