चंद्रपूरात १४तारखेपर्यंत कोणाला येऊ देणार ना जाऊ देणार : जिल्हाधिकारी


14 तारखेपर्यंत चंद्रपूर कोणी सोडणार नाही;

व चंद्रपुरात कोणाला येऊ देणार नाही : जिल्हाधिकारी

Ø कोरोना विरुद्धची लढाई आता अंतिम टप्प्यात

Ø मशीदमधुन ताब्यात घेतलेले 11 नागरीकांचा अहवाल निगेटिव्ह

Ø शाळा कॉलेजेस मध्ये शैक्षणिक फी घेऊ नये

Ø सेतू केंद्रांमधून 2 दिवसात बँकेचे व्यवहार सुरू होतील

Ø बँकेमध्ये अतिरिक्त गर्दी करू नये; सुरक्षित अंतर राखावे

Ø मोफत धान्य वितरणाला सुरुवात

Ø जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही

Ø विदेशात प्रवास केलेल्या 204 नागरिकांची जिल्हात नोंद

Ø विदेशात प्रवास केलेल्या 176 नागरिकांचे होम कॉरेन्टाईन पूर्ण

Ø शिवभोजन योजनेची व्याप्ती वाढवणार

Ø जिल्ह्यातील शेल्टर होम मध्ये 5298 नागरिक

चंद्रपूर, दि.3 एप्रिल : कोरोना विषाणू संसर्गाच्या लढाईमध्ये अंतिम टप्प्यात आपण आलो असून नागरिकांनी घराबाहेर पडून जीव धोक्यात घालू नये. चंद्रपूर जिल्ह्यात सध्या एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही. अशा परिस्थितीत चंद्रपूर जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची कडक तपासणी करणे, चंद्रपुरात असणाऱ्या नागरिकांनी बाहेर न पडणे आणि जे आत मध्ये आहेत त्यांनी सोशल डिस्टन्स अर्थात सामाजिक अंतर राखून घरातच राहणे योग्य राहील. ही लढाई आपण सर्वांनी मिळून लढायची असून त्यासाठी आपापली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले आहे.

आज 3 एप्रिल रोजी जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधताना आत्तापर्यंत नागरिकांनी प्रचंड संयमाने साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले आहे. घरातील सुदृढ असणाऱ्या एकाच व्यक्तीला पुढील आठवडाभर एकदाच बाहेर पडावे लागेल असे नियोजन करा. सामाजिक अंतर राखा. जिल्ह्यामध्ये कोणी येणार नाही याचा कडेकोट बंदोबस्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वात राबविला जात आहे. चंद्रपूरमध्ये जे कुणी अडकून पडले असेल किंवा ज्यांना बाहेर जायचे असेल त्यांनी देखील पुढील 14 तारखेपर्यंत संयम पाळावा. कोणीच आतून बाहेर जाणार नाही व बाहेरून आत येणार नाही. त्यामुळे कोरोनाची लागण जिल्ह्यांमध्ये होणार नाही. बाहेर पडण्यासाठी अनावश्‍यक धडपड करणाऱ्यांनी देखील ही बाब लक्षात घ्यावी, असे आवाहन त्यांनी आज केले.

नवी दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन परिसरातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काही नागरिकांना ताब्यात घेण्यात आले होते. ते सर्व नागरिक तपासणीअंती निगेटिव निघाले आहेत. सोबतच त्यांना दिल्ली सोडून 14 दिवसांवर कालावधी झाला आहे. तरीही पण त्यांना पुढील 14 दिवस होम कॉरेन्टाईन करण्यात आले आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंत विदेशात जाऊन आलेल्या 204 प्रवाशांची नोंद झाली आहे. यापैकी 14 दिवसांच्या निगराणीत असणाऱ्या प्रवाशांची संख्या 28 आहे. तर 14 दिवसांची तपासणी करण्यात आलेल्या विदेशातून आलेल्या नागरिकांची संख्या 176 आहे.आतापर्यंतचे सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहे. जिल्ह्यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही.

जिल्ह्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या शिधापत्रिकाधारकांना नियमीत मिळणाऱ्या धान्य सोबत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 5 किलो तांदूळ मोफत मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेताना गडबड होणार नाही याची काळजी घ्यावी. आज या योजनेचा शुभारंभ चंद्रपूर शहरातून करण्यात आला आहे. आपल्या रेशन कार्ड वर मिळणाऱ्या अन्य अन्नधान्यासाठी 2 व 3 रुपये दराने आपल्याला खरेदी करता येणार आहे. मात्र तांदूळ हा मोफत मिळत आहे. त्यामुळे सरसकट मोफत अन्नधान्य नसून रेशन कार्ड वर मिळणारी ही सुविधा आहे, हे लक्षात घ्यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

जिल्ह्यातील काही शाळा व महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या मागे शैक्षणिक फी, परीक्षा फी यासाठी तगादा लावत असल्याच्या तक्रारी आल्या असून या परिस्थितीत कोणीही अशा प्रकारची वसुली करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल,असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी आजच्या संबोधण्यात दिले आहे.

सध्या वेगवेगळ्या योजनेमधून अल्प आर्थिक गटातील नागरिकांसाठी बँकेच्या मार्फत अनुदान वाटप होत आहे. तसेच प्रधानमंत्री जनधन योजनेत खाती उघडलेल्या सर्व महिला खातेदारांच्या खात्यांवर 500 रुपये येणार आहे. त्यामुळे बँकांचे काम वाढले असून गर्दी होऊ शकते.मात्र यासाठी सुचविण्यात आलेले उपाय लक्षात घेऊनच बँकेमध्ये नागरिकांनी प्रवेश करावा. तसेच याठिकाणी गर्दी होणार नाही सामाजिक अंतर राखून बँकेचे व्यवहार होतील यासाठी सहकार्य करावे.पुढील काही दिवसात बँकेवरील तान कमी करण्यासाठी सेतू केंद्रांमधून बँकेचे व्यवहार सुरू करण्याबाबतचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी देखील नागरिकांनी मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्थांनी मोठ्या प्रमाणात तयार केलेले अन्न वाटपामध्ये मदत केल्याबद्दल त्यांनी या सर्व संस्थांचे आभार मानले. जिल्ह्यामध्ये सध्या 5 हजारावर अन्य राज्यातील व अन्य जिल्ह्यातील नागरिक शेल्टर होम मध्ये आश्रयाला आहे. या सर्वांना व्यवस्थित खानपान मिळावे तसेच त्यांची कोणतीही तक्रार राहू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. चंद्रपूर, वरोरा, बल्लारपूर व राजुरा याठिकाणी शिवभोजन योजनेअंतर्गत आतापर्यंत बाराशेच्यावर तयार अन्नाचे पॅकेट वितरित करण्यात येत आहे. ही योजना आणखी विस्तारित करण्यात येईल त्यासाठी देखील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.