- 9 प्रवासी संस्थात्मक क्वारेन्टाईन मध्ये
- आयसोलेशन वॉर्डमध्ये 3 रुग्ण
- जिल्ह्यामध्ये एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही
- आरोग्य विभागाचे मोठ्याप्रमाणात प्रशिक्षण सुरू
- गरजेनुसार सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा द्यावी लागणार
- जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहिल
- अन्य राज्यातील नागरिकांनी जिथे आहे तिथेच थांबावे
- राज्यातील नागरिकांनीदेखील अन्य राज्यात जिथे आहे तिथेच थांबावे
- जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना टोल नाही
- तालुकास्तरावर शिवभोजन सुरू करण्याचे प्रशासनाचे निर्देश
- तेलंगाना,तामिळनाडू,आंध्र, मध्य प्रदेश मधील अनेक नागरिक आश्रयाला
- हॅलो चांदा वरूनही आता कोरोना विषयी माहिती मिळणार
- महिनाभर घरमालकांनी किरायादाराला घर खाली करण्यास सांगू नये
चंद्रपूर,दि. 29 मार्च: कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसोबतच जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम होत आहे. मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण सुरू असून उद्रेकाच्या काळात सामना करण्याची तयारी केली जात आहे. मात्र या उद्रेकाच्या मुळाशी असणारा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर निघू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. उद्यापासून पोलिसांची कारवाई सक्त होणार असून जिल्ह्यातील सर्व खासगी डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडण्याबाबतही जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आज जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांच्या मार्गदर्शनात झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिकेचे आयुक्त राजेश मोहिते, उपजिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते.
विनाकारण घराबाहेर पडून कोरोना आजाराला आमंत्रण देणाऱ्या नागरिकांवर आता सक्ती केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे. सार्वजनिक वितरण प्रणाली, किराणा दुकानदार, भाजीपाला विक्रेते, यांनी शासनाने दिलेले सर्व नियम व्यवस्थित पाळणे आवश्यक आहे. याबाबत मनमानी करणाऱ्यांवर देखील कारवाई करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
चंद्रपूर महानगर तसेच जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी आणि सार्वजनिक वितरण प्रणाली मध्ये काम करणारे भाजीविक्रेते, किराणा दुकानदार व जीवनावश्यक सेवेत असणाऱ्या सर्व दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी या परिस्थितीमध्ये कुठल्याही बाबीवर अडून न राहता शासनाच्या निर्देशाप्रमाणे काम करण्याचे स्पष्ट संकेत आज देण्यात आले आहे.
उद्रेकाच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असल्यामुळे यावेळी सर्व नागरिकांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी आपले दवाखाने पूर्ववत सुरू करावे. काहींनी सामाजिक जाणीव ठेवून यामध्ये पुढाकार घेतला आहे .मात्र इंडियन मेडिकल कौन्सिलच्या सर्व सदस्यांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी आपले दवाखाने पूर्ववत सुरू करावे. कोणाच्या दहशती मध्ये असणाऱ्या सामान्य रुग्णांकडून नियमित स्वरूपाचे तपासणी शुल्क घ्यावे, दवाखाने सुरू न करणाऱ्या डॉक्टरांवर प्रसंगी कारवाई केली जाईल ,असेही आज उच्चस्तरीय बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता एस. एस. मोरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात आवश्यक प्रशिक्षण सुरू झाले आहे. वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक असणारे मास्क आणि पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असून आणखी काही साहित्य पोहचत आहे. लवकरच हे साहित्य उपलब्ध होणार असून जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्गदर्शनात 100 बेडचे अद्यावत कोरोना ट्रिटमेंट वरील वार्ड उभा झाला आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडून यासाठी आवश्यक असणारी कारवाई करण्याचे निर्देश आजच्या बैठकीत देण्यात आले.
संचार बंदीच्या काळामध्ये जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व खाद्यपदार्थ पुरवणाऱ्या सेवा सुरू ठेवलेल्या असून कुठल्याही वस्तूंची टंचाई नाही. त्यामुळे नागरिकांनी पण अनावश्यक कारणासाठी बाहेर पडू नये अशी देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितले.परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील कामगार अडकलेली आहेत. अशा कामगारांची प्रशासन व स्वयंसेवी संस्थांमार्फत काळजी घेण्यात येत आहे. अडकलेल्या कामगारांबाबतची माहिती स्थानिक लोकांनी देखील आवश्यक असणाऱ्या हेल्पलाइन क्रमांकावर द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मोफत भोजन हे केवळ निराश्रित, बेघर, विमनस्क लोकांसाठी आहे. त्यामुळे यासाठीचा आग्रह करण्यात येऊ नये. मोफत भोजन वितरण करताना गरजू व्यक्ती उपेक्षित राहू नये, मात्र ज्यांच्याकडे स्वयंपाकाची व्यवस्था आहे. अशा कोणत्याही व्यक्तीला या वाटपात सहभागी करण्यात येऊ नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील नगरपालिका,नगरपरिषद येथे शेल्टर होमची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे. त्यांना भोजनाची व वैद्यकीय मदत मिळण्यासाठी पुरेपूर प्रयत्न जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आली आहे. परराज्यातील तसेच परजिल्ह्यातील कामगार यांना मदतीची गरज असेल त्यांनी संबंधित तहसील व नगरपालिका त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. त्यांची पूर्ण व्यवस्था मोफत करण्यात येईल. जिल्ह्यात असणाऱ्या अन्य राज्यातील नागरिकांनी घाबरून न जाता सुविधांचा योग्य वापर घ्यावा व अन्य ठिकाणी असणाऱ्या नागरिकांनी देखील त्याच ठिकाणी राहून जिल्ह्यात पोहोचण्याचा प्रयत्न करु नये असे, आवाहन करण्यात आले आहे.
कोरोनामुळे सर्वत्र बंद असल्यामुळे कोणत्याही घर मालकाने किरायादाराला घर खाली करायला सांगू नये. तसेच, एक महिन्याचे घर भाडे सध्या घेऊ नये असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
आतापर्यंतच्या काळामध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी सहकार्य केले असुन असेच सहकार्य 14 एप्रिल पर्यंत अपेक्षित असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने भाजीदुकाने लावून दिलेली आहेत. या दुकानांमध्ये भाजी घेताना नागरिकांनी 1 मीटरचे अंतर ठेवणे गरजेचे आहे.
प्रधानमंत्री सहायता निधी व मुख्यमंत्री सहायता निधी यामध्ये अनेक संस्थांनी लाखो रुपयांची मदत केली आहे. यामध्ये आणखी मदतीची आवश्यकता असून जिल्ह्यातील नागरिक व संस्थांनी स्वतः पुढे येऊन या कोरोनावर मात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन देखील जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
जिल्ह्यातील अनेक कामगार,नागरीक इतर राज्यांमध्ये अडकलेले आहेत अशा नागरिकांशी जिल्हा प्रशासन दररोज संपर्क साधत आहे. हे सर्व नागरिक येथे सुरक्षित असून त्यांची पूर्ण काळजी घेण्यात येत आहे.
- शहरात विविध सामाजिक संस्थांमार्फत सध्या भोजनदान चालू असून नागरिकांनी आपल्या अवतीभवती अशा पद्धतीने कोणाची उपासमार होत असल्यास महानगरपालिकेच्या 07172-254614 या क्रमांकावर संपर्क साधावा.कॉरेन्टाईन संदर्भात तक्रार अडचणी असल्यास 07172-253275, 07172-261226 या क्रमांकावर संपर्क साधावा. उपचार, समुपदेशन, पाठपुरावा, अॅम्बुलन्स हवी असल्यास जिल्हा रुग्णालयाच्या 07172-270669 या क्रमांकावर संपर्क साधावा. तर रुग्ण, प्रवाशांची चौकशी, शहरी व ग्रामीण भागात अन्नधान्याची कमतरता यासाठी 07172-251597, टोल फ्री क्रमांक 1077 यावर चौकशी करता येणार आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना अडचण असल्यास त्यांनी आरटीओच्या 07172-272555 या क्रमांकावर फोन करावा उद्यापासून पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलोचांदा सुरू होत असून टोल फ्री क्रमांक 155-398 वर दूरध्वनी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे