संविधान प्राणपणाने जपले पाहिजे: रमेशभाई खंडागळे



औरंगाबाद:संविधानाच्या माध्यमातून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हा देश एकसंध ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. हे संविधान प्राणपणाने जपणे आणि बाबासाहेबांनी जे जे दिले, ते आपण जपणे ही काळाची गरज बनली आहे. हे जर आपण करु शकलो नाही तर संविधानही राहणार नाही आणि आपणही राहणार नाही, असा स्पष्ट इशारा मंगळवारी प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते व भारतीय दलित पॅंथरचे नेते ॲड. रमेशभाई खंडागळे यांनी दिला.
ते खोकडपुर्‌यातील आंबेडकर भवनात बोलत होते. सामाजिक न्याय खात्याच्या वतीने २६ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर समता पर्व साजरा करण्यात आला. ॲड. खंडागळे यांच्या व्याख्यानाने या पर्वाचा समारोप करण्यात आला. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर हे अध्यक्षस्थानी होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲड. विजय जाधव,स.सो.खंडाळकर, वरिष्ठ पत्रकार यांचेही भाषण झाले.
ॲड. खंडागळे यांनी, बाबासाहेबांना बसलेले जातीयवादाचे चटके, महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभेेद असूनही असलेला जिव्हाळा याकडे उपस्थितांचे लक्ष वेधले.
प्रादेशिक उपायुक्त्, समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण व जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आंबेडकर भवनातील सभागृह खच्चून भरले होते.प्रारंभी, सामाजिक न्याय विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांनी प्रास्ताविक केले. त्यात त्यांनी, समता पर्वात आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेतला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय देवकते यांनी केले. सहाय्यक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी आभार मानले.
यावेळी जात पडताळणी उपायुक्त संजय दाणे,संशोधन अधिकारी दीपक खरात, भटक्या विमुक्त चळवळीतील अमीनभाई जामगावकर, तोताराम जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने महिला, कर्मचारी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.