ओबीसीची जातनिहाय जनगणनेसाठी संसदेवर मोर्चा काढणार- आ.महादेव जानकर



सोलापूर/प्रतिनिधी:
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री आ.महादेव जानकर महाराष्ट्र विधानमंडळाच्या पंचायत राज समितीच्या तीन दिवसांच्या सोलापूर जिल्ह्याच्या शासकीय दौ-यावर असताना रासप पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात बोलत असताना ओबीसीची जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी संसदेवर रासपच्या वतीने मोर्चा काढणार असल्याचे प्रतिपादन आ.महादेव जानकर यांनी केले.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक १७ जून रोजी दुपारी ३ वा. शांतीसागर मंगल कार्यालय सोलापूर येथे सोलापूर शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष आ.महादेव जानकर होते तसेच प्रदेशाध्यक्ष काशीनाथ शेवते , मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर, प. महाराष्ट्र अध्यक्ष संजय माने, उपाध्यक्ष सुनिल बंडगर, युवक अध्यक्ष अजित पाटील, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष पंकज देवकते या प्रमुख पदाधिका-यांनीही या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
जानकर म्हणाले, राष्ट्रीय समाज पक्ष हा नेतृत्व घडवणारा पक्ष असून आम्ही महात्मा फुलेंच्या विचारधारेवर काम करीत असून विचारधारे पासून कधीच दूर गेलेलो नाही. राजकारणात केलेली तडजोड वेगळी आणि विचारधारा वेगळी असते . आपली विचारधारा आणि भूमिका कार्यकर्त्यानी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवल्या पाहिजेत तसेच जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरा असा आदेश दिला.


ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा घोळ कायमचा मिटवण्यासाठीओबीसीची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ही राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी असून येणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात संसदेवर देशातील सर्व कार्यकर्ते आणि ओबीसी समाज घेऊन महामोर्चा काढणार असून ओबीसी जो या देशाचा खरा मालक आहे तोच गलितगात्र आणि मागतकरी झाला आहे. त्यामुळे त्याला मुख्य प्रवाहात आणून या देशाचा सत्ताधीश बनवणे हा राष्ट्रीय समाज पक्षाचा मुख्य अजेंडा आहे यासाठी या राज्यातील तसेच देशातील ओबीसी समाजाने राष्ट्रीय समाज पक्षाच्या विचाराला भक्कमपणे साथ द्यावी असे अवाहन जानकर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी पक्षाचे जिल्ह्यातील जिल्हा पदाधिकारी, सर्व तालुका अध्यक्ष तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अध्यक्ष रणजित सूळ, जिल्हा संपर्क प्रमुख श्रीमंत हक्के, शहरप्रमुख सतीश बुजरूके यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. संजय वलेकर यांनी केले.