▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455

राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता



राज्यात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता
राज्यात ६ ते १० जानेवारीला काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर भारतात सातत्याने निर्माण होत असलेले पश्‍चिमी चक्रावात आणि त्यात अरबी समुद्रातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रातील (Maharashtra) तुरळक ठिकाणी शुक्रवारी (ता. ७) मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात (Vidarbha) तुरळक ठिकाणी गारपीट होऊ शकते. काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा तर काही ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडेल. तर विदर्भात ९ जानेवारीला गारपिटीची शक्यता असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. राज्यात ६ ते १० जानेवारीला काही भागांमध्ये ढगांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडील वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणामस्वरुप देशातील काही राज्यात पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रावरही पावसाचे सावट असून विदर्भासह मराठवाड्यात जास्त प्रभाव असू शकतो. शुक्रवारी (७ जानेवारी) नाशिकला (Nashik) पाऊस झाला आहे. तर धुळे (Dhule) नंदुरबार (Nandurbar), जळगाव (Jalgaon), अहमदनगरमध्ये (Ahamednagar) आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय ८ तारखेला ठाणे (Thane), पालघर (Palghar), उत्तर महाराष्ट्रासह (Uttar Maharashtra) विदर्भात पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. तर ९ तारखेला मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात पावसासाठी पोषक हवामान

राज्याच्या अनेक भागात किमान तापमानात वाढ होत असून थंडी कमी झाली आहे. बहुतांश ठिकाणी किमान तापमान १३ ते २१ अंशाच्या दरम्यान, तर कमाल तापमान २८ ते ३२ अंशांदरम्यान नोंदले जात आहे. गुरुवारी राज्यातील सर्वाधिक कमाल तापमान सोलापूर येथे ३२.८ अंश सेल्सिअस तर नीचांकी तापमानाची नोंद गोंदिया येथे १२.५ अंश सेल्सिअस इतकी झाली.