▪️ Editor - Sanjay Kannawar ▪️ Mobile - 9158399455 ▪️ RNI No. MAHMAR/2011/37424/

मी कारवाई करण्यापूर्वी तु निर्णय घे अश्या परखड शब्दात मुख्यमंत्र्यांनी राठोडांना खडसावलेमुंबई,(वृत्तसंस्था)- टिकटॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्येचा संशय आणि मुख्यमंत्र्यांचे निर्देश धुडकावून पोहरादेवी येथे हजारोंची गर्दी जमवल्याच्या प्रकरणानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले वनमंत्री संजय राठोड अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. कारवाई करण्यापूर्वी तू निर्णय घे, अशा शब्दांत पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बजावल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
राज्य सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन १ मार्चपासून मुंबईत सुरू होत आहे. या अधिवेशनात पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी विरोधक सरकारला घेरण्याच्या पुर्ण तयारीत आहेत. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याचे निश्चित केल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली. तत्पूर्वी, मंगळवारी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती. त्या वेळी राठोड यांचा राजीनामा घेण्याबाबत पवारांनी सल्ला दिला होता. तसेच राठोड यांच्या राजीनाम्याबाबत महाविकास आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांत एकमत आहे. त्यासोबतच मुख्यमंत्री, शिवसेना आणि आघाडी सरकारच्या प्रतिमेचा सवाल आहे.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी भाजपकडून प्रथमच लेखी तक्रार अर्ज करण्यात आला आहे. खासदार गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांनी वानवडी पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे. वनमंत्र्यांंच्या दबावाला व छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असून संजय राठोडांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.